विद्येचे माहेरघर, निवृत्तीनंतर (पेन्शनरांचे) शांत आणि सुरक्षित राहण्याचे शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहराची ओळख आता बदलली आहे. वाहतुकीची होणारी कोंडी, एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी लागणारा वेळ, जबरी चोऱ्या, खून, छेडछाड अशा अनेक गोष्टींमुळे पुणे शहराची ख्याती सर्वदूर पसरत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर, तसेच चौकाचौकांत वाहतुकीचा प्रश्न बिकट होत असून, रस्त्यावरील अपघात, तसेच सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा कोलमडली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मुख्य रस्त्यांसह अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला होतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले असून, याची देखभाल दुरुस्तीदेखील होत नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून बसविण्यात आलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे कोणत्याही उपयोगाशिवाय अक्षरशः धूळखात पडलेले आहेत. बंद पडलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिका निधी उपलब्ध करून देत नसल्याने ही यंत्रणा बंद अवस्थेत आहे. आजही शहरातील ७५० हून अधिक कॅमेरे बंद असून, निधीअभावी त्यांची देखभाल-दुरुस्ती रखडली आहे.
आणखी वाचा-शहरातील पूरस्थितीच्या अहवालाची प्रत देण्यास पालिकेचा नकार, काय आहे कारण..?
शहरातील विविध भागांत आणि रस्त्यांवर सुमारे २९०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. काही कॅमेरे हे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने, तर काही सीसीटीव्ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बसविण्यात आले आहेत. नगरसेवकांच्या निधीतून हे कॅमेरे बसविले गेले आहेत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगारी, चोऱ्या, अपघात या घटनांवर लक्ष ठेवून चौकाचौकांत होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मदत होईल, या हेतूने ते लावण्यात आले. मात्र, एकूण कॅमेऱ्यांपैकी एक हजाराहून अधिक कॅमेरे नादुरुस्त असल्याची माहिती गणेशोत्सवापूर्वी समोर आली होती. या कॅमेऱ्यांची दुरुस्ती कोणी करायची यावरून महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यात वाद सुरू होता. रस्त्यावर बसविलेल्या या कॅमेऱ्यांची दुरुस्ती महापालिका कशी काय करणार, असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला होता.
कॅमेऱ्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगत महापालिकेच्या विद्युत विभागाने हात वर केले होते. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुढे येत महापालिकाच सीसीटीव्ही दुरुस्त करेल, असे जाहीर केले होते. यासाठी विद्युत विभागाच्या मागणीनुसार कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांचा निधी वर्गीकरणाने उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतर शहरातील बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती सुरू झाली होती. गणेशोत्सवापूर्वी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र, अद्यापही अनेक चौकांतील कॅमेरे बंदच असल्याचे समोर आले आहे. शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच दुरुस्त होतील, असे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून दिले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र हे कॅमेरे दुरुस्त होण्यासाठी विलंब लागत आहे.
आणखी वाचा-पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी
वाहनचोरी, दरोडा, रस्त्यांवरील अपघात, वर्दळीच्या ठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी अशा घटना सातत्याने शहरात घडत आहेत. महिलांवर अत्याचार, छेडछाड, कोयता गँगकडून घातला जाणारा धुडगूस अशा गंभीर घटना शहरात घडत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या घटनांमध्ये वाढच होत असल्याचे चित्र आहे. या सर्व वाढत्या समाज विघातक घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये, तसेच रस्त्यांवर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मात्र, अनेक महत्त्वाच्या ठिकाणचे हे कॅमेरे नादुरुस्त असल्याने पोलीस प्रशासनाला तपास कार्यात अडथळा येत असल्याचे दिसून आले आहे.
काही कोटी रुपयांचा निधी खर्च करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि तपास कामात उपयोग व्हावा यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. मात्र, याची देखभाल-दुरुस्तीदेखील योग्य पद्धतीने होत नसेल आणि त्याचा काहीही फायदा तपास यंत्रणांना होत नसेल, तर हे सीसीटीव्ही कॅमेरे शहरातील चौकांमध्ये केवळ शोभेसाठीच लावण्यात आलेले आहेत का, असा प्रश्न पडतो. शहरातील नागरिकांना सुरक्षितपणे राहता यावे, तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी तपास यंत्रणांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे हे सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्त करून याची देखभाल-दुरुस्ती वेळेवर करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने पूर्णपणे पार पाडली पाहिजे अन्यथा पुणेकर महापालिकेला कधीही माफ करणार नाहीत.
chaitanya.machale@expressindia.com