पिंपरी : शहरातील सार्वजनिक ठिकाणी राज्य शासनाकडून एक हजार ४०८ आणि स्मार्ट सिटी अंतर्गत तीन हजार ५०० असे चार हजार ९०८ बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचा वाहतूक नियोजन, गुन्हेगारी प्रतिबंध यासाठी वापर होत आहे. शहरातील आस्थापनांनी कार्यालये, दुकानांसमोर एक कॅमेरा रस्त्याच्या दिशेने बसवावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील नागरिकांकडून घरे, कार्यालये अथवा दुकानांपुरता सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येतो. अनेक जण रस्त्याच्या दिशेने कॅमेरा लावणे टाळतात. त्यामुळे एखाद्या ठिकाणी चोरी झाल्यास चोरीच्या घटनेचे चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागते. मात्र, चोर कोणत्या दिशेने आले आणि गेले, याबाबत तत्काळ माहिती मिळत नाही. रस्त्याच्या दिशेने कॅमेरा आहे का, हे पोलिसांना शोधावे लागते. जिथे कॅमेरा असेल तिथून चित्रीकरण मिळवून पुढील कारवाई केली जाते. यामध्ये पोलिसांचा वेळ जातो. तर, आरोपींना पळून जाण्यासाठी वेळ मिळतो. रस्त्याच्या दिशेने कॅमेरे बसविल्यास रस्त्यावर कोणतीही अनुचित घटना घडल्यास आरोपीची ओळख पटविण्यासाठी मदत होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >>>सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार

‘सीसीटीव्ही’द्वारे गंभीर गुन्ह्यांची उकल

अनेक गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली आहे. इतर राज्यांतून शहरात येऊन एटीएम फोडणाऱ्या टोळीला सीसीटीव्ही चित्रीकरणावरून पोलिसांनी अटक केली होती. चिखलीमध्ये तीन वर्षांच्या मुलीचे नरबळीसाठी अपहरण झाले होते. त्या गुन्ह्यातील आरोपींनादेखील केवळ सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे अवघ्या काही तासांत अटक केली होती. भोसरी येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून गोव्याला पळून जात असलेल्या आरोपीलादेखील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे अटक करण्यात आली होती.

हेही वाचा >>>पुणे : थेऊर येथे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीवर गुन्हा दाखल

निर्जन ठिकाणांवरही निगराणी महत्त्वाची

सार्वजनिक ठिकाणी महापालिकेने सीसीटीव्ही बसवले आहेत. खासगी आस्थापनांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, शहरातील मोकळी मैदाने, मोकळ्या जागा, महामार्ग आणि इतर निर्जन ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत. शहरातील एमआयडीसी परिसरात अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. अशा ठिकाणीदेखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह पोलीस गस्त वाढविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली.

अनेक नागरिकांनी घरे आणि दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. एक कॅमेरा घर अथवा दुकानासमोरील रस्ता निगराणीत येईल, अशा पद्धतीने लावणे आवश्यक आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येईल. तसेच घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी ते उपयोगी ठरतील, असे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv cameras were installed by the state government in public places in pimpri city pune print news ggy 03 amy