पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे गुरवमध्ये परिसरात भरदिवसा दोन अज्ञात चोरांनी अवघ्या सहा मिनिटांत घरफोडी करत तब्बल ८० हजार रुपये लंपास केले आहेत. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. घोटकर कुटुंबाने दोन वर्षांची भिशी आणि पगाराचे पैसे जमा केले होते. त्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.
सविस्तर माहिती अशी की, पिंपळे गुरवच्या सृष्टी चौक येथील आशादीप रेसिडेन्सी येथे गजानन सखाराम घोटकर हे राहतात. आज दुपारी त्यांची पत्नी धुंदाबाई या घरी होत्या.जास्त थंडी असल्याने त्या घरापासून हाकेच्या अंतरावर उन्हात बसल्या होत्या, याचीच संधी साधून दोन अज्ञात चोरांनी सोसायटीमधील हालचाली पाहून दरवाजाचा कोयंडा तोडला आणि घरातील भिशीची रक्कम (८० हजार रुपये) लंपास केले. ही चोरी अवघ्या ६ मिनिटांत केली आहे. चोरी दरम्यान अनेकजण गाडी पार्किंग करत वरच्या मजल्यावर जाताना दिसतात.परंतु चोरांना कुठल्याच प्रकारची भीती राहिली नसल्याचे या घटनेतून समोर आले आहे. दरम्यान, याच सोसायटीमध्ये या अगोदर देखील चोरी झाल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.
पाहा सीसीटीव्ही –
CCTV: पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा घरफोडी;अवघ्या ६ मिनिटांत ८० हजार रुपये लंपासhttps://t.co/ZfyIjgJO7V pic.twitter.com/rMkvAxsLcw
— LoksattaLive (@LoksattaLive) January 10, 2019