सासवड येथे जानेवारीमध्ये होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनातील २५० गाळ्यांची गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणात सोडत काढण्यात आली. शंभराहून अधिक प्रकाशकांना हे गाळे वितरित करण्यात आले असून ग्रंथचोरीच्या घटनांवर प्रतिबंध रीहावा यासाठी ग्रंथप्रदर्शनावर यंदा प्रथमच ‘सीसीटीव्ही’ची करडी नजर असेल. त्याचप्रमाणे स्वतंत्र व्हीआयपी कक्ष साकारण्यात येणार असून तेथे लेखक वाचकांना पुस्तकावर स्वाक्षरी देऊ शकतील.
सासवड येथे ३ ते ५ जानेवारी या कालावधीत साहित्य संमेलन होणार आहे. पालखी तळावर मुख्य मंडप असून समोरच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये ग्रंथप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये असलेल्या २५० गाळ्यांची गुरुवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयामध्ये सोडत काढण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते यांच्यासह विविध प्रकाशन संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चार गाळ्यांची मागणी करणाऱ्या प्रकाशन संस्थांची सूची करून ही सोडत प्रथम काढण्यात आली. एका गाळ्यासाठी साडेचार हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. त्यानंतर तीन गाळे, दोन गाळे याप्रमाणे सोडत काढण्यात आली. प्रकाशकांच्या गाळ्यांखेरीज साहित्य महामंडळ, महामंडळाच्या घटक संस्था, राज्य सरकारच्या संस्था यासाठी २० गाळे राखून ठेवण्यात आले आहेत. ग्रंथप्रदर्शनातील गाळ्यांच्या दोन रांगांमध्ये १३ फूट अंतर ठेवण्यात आले असून एका वेळी दोन टेम्पो तेथून जाऊ शकतील, अशी सुविधा करण्यात आली आहे. याखेरीज खाद्यपदार्थासाठी चार गाळे राखून ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती प्रकाश पायगुडे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा