वाढती गुन्हेगारी व पोलिसांच्या मर्यादा लक्षात घेऊन सुरक्षतितेचा उपाय म्हणून निगडीतील १० चौकांमध्ये लोकवर्गणीतून सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी पुढाकार घेतला असून गुरुवारी महापौर मोहिनी लांडे व पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. अशाप्रकारे राबवण्यात येणारा शहरातील हा पहिलाच उपक्रम आहे.
निगडी यमुनानगर येथील प्रभू रामचंद्र चौक, मॉडर्न हायस्कूल चौक, दुर्गानगर रस्ता व बसथांबा या चार ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. अन्य सहा ठिकाणी पुढील टप्प्यात कार्यवाही होणार आहे. निगडीतील व्यापारी, उद्योजक व प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला, त्यानुसार काहींनी खर्चाचा वाटा उचलण्याची तयारी दर्शवली. गुरूवारी सायंकाळी चार वाजता रामचंद्र चौकात उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. संयोजन नगरसेविका संगीता पवार, शरद इनामदार, धनाजी शिंदे यांनी केले आहे.
या संदर्भात, उबाळे यांनी पत्रकारांना सांगितले, शहरातील सोनसाखळी चोऱ्या तसेच गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी कमतरता असल्याचे सांगण्यात येते. प्रत्येकाला सुरक्षा कर्मचारी ठेवणे परवडणारे नाही. यमुनानगरमध्ये आठ दिवसांत चार घरफोडय़ा झाल्याने नागरिक भयभीत आहेत. अशात, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही बसवण्याचा विचार पुढे आला व त्यास सर्वाचे पाठबळ मिळाले. गणरायाच्या आगमनापूर्वी हा उपक्रम राबवण्यात येत असून त्यामुळे आगामी काळात गुन्हेगारी घटनांना आळा बसू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा