येरवडा मनोरुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवली जात असून या आधीच्या दोन निविदा प्रक्रियांसाठी एकाही पुरवठादाराने अर्ज न केल्याची माहिती समोर आली आहे. ८३ एकर जागेत विखुरलेल्या मनोरुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे कसे, त्यांचे नियंत्रण कसे करायचे आणि ते कॅमेरे शाबूत राहण्याची शाश्वती काय, हाच प्रश्न पुरवठादारांकडून विचारला जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मनोरुग्णालयातील ‘इंटरकॉम’ यंत्रणेचा पूर्वीच बाजा वाजला असून मनोरुग्णांवर देखरेख करणाऱ्या ‘अटेंडंट’ कर्मचाऱ्यांची ५५० पैकी १३८ पदेही रिक्त आहेत. त्यातच सीसीटीव्ही निविदांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ही यंत्रणाही लवकर येण्याची काहीही चिन्हे नाहीत.
नोव्हेंबर २०१३ मध्ये मनोरुग्णालयातील एका रुग्णाने रागाच्या भरात इतर दोन रुग्णांची हत्या केली होती. या घटनेनंतर मनोरुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विषय ऐरणीवर आला आणि ३७ ठिकाणी कॅमेरे बसवणे निश्चित करून त्यासाठी ७० लाख रुपयांच्या निधीचा अंदाज सादर करण्यात आला. यानंतर कॅमेऱ्यांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली, पण ही प्रक्रिया दोन वेळा राबवून देखील एकानेही त्यात अर्ज केलेला नाही. आता सीसीटीव्हीसाठी तिसऱ्यांना निविदा प्रक्रिया राबवली जात असून त्याची निविदापूर्व  बैठक (प्री-बिड मीटिंग)२८ ऑगस्टला झाली. या बैठकीसाठी पाच पुरवठादार हजर राहिले होते.
मनोरुग्णालय ८३ एकरांवर पसरलेले असून त्यातल्या इमारतींची संख्या १५८ आहे. यातील विशेषत: पुरुषांचे रुग्णकक्ष विखुरलेले आहेत. एकेका रुग्णकक्षातील रुग्णांची संख्याही मोठी आहे. काही विशिष्ट रुग्णकक्षात एका खोलीत एक किंवा दोन रुग्ण आहेत. सीसीटीव्ही लावताना ते नेमके कुठे लावावेत, सीसीटीव्हीचे वायरिंग आणि नियंत्रण कसे करावे आणि कॅमेरे लावले तरी ते टिकण्याची शाश्वती काय, असे प्रश्न पुरवठादारांकडून उपस्थित केले जात आहेत.

‘इमारतींमधील अंतर व रुग्णांची संख्या पाहता सीसीटीव्हीचे वायरिंग व नियंत्रण हा मोठा प्रश्न आहे. हे कॅमेरे तीन टप्प्यांत बसवण्याचा विचार असून प्रथम मनोरुग्णालयातील प्रशासकीय इमारत व दुसऱ्या टप्प्यात मेट्रन ऑफिस व स्त्री रुग्णांकडच्या बाजूस ते बसवता येतील. तिसऱ्या टप्प्यात आत्महत्येचे विचार असलेले रुग्ण, उत्तेजित होऊन विपरित काही करण्याची शक्यता असलेले रुग्ण, तसेच गुन्हेगार मनोरुग्णांच्या कक्षात कॅमेरे बसवता येतील.’
– डॉ. भालचंद्र डोंगळीकर, मनोरुग्णालय अधीक्षक

Story img Loader