सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या केबल टाकण्यासाठी महापालिकेतर्फे देण्यात आलेली वाढीव मुदत शुक्रवारी संपली. यानंतरही या कामासाठी केबल टाकायची असेल, तर ती उपलब्ध असलेल्या डक्टमधून किंवा ओव्हरहेड स्वरूपाच्या तारांमधूनच टाकावी लागेल, असे महापालिकेतर्फे कळवण्यात आले आहे.
पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून महापालिकेने यंदा एप्रिलपासूनच विविध कामे हाती घेतली होती. त्यात खड्डे बुजवणे आणि रस्तायंचे डांबरीकरण यावर भर देण्यात आला होता. पावसाळ्याच्या तोंडावर कोणत्याही कामांसाठी रस्ते खोदले जाऊ नयेत यासाठीही सर्व खात्यांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार १५ एप्रिलपासून रस्ते खोदाईला बंदी करण्यात आली आहे. मात्र, सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या केबल टाकण्याची कामे शहरात मोठय़ा प्रमाणावर सुरू असून या आदेशामुळे ही कामे थांबवणे भाग पडणार होते. त्यावर उपाय म्हणून फक्त सीसी टीव्हींच्या केबल टाकण्यासाठी एक महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली होती. शहरात कोथरूड, वारजे, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना वगैरे भागात ही परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यासाठीही २० जूनपर्यंतची मुदत होती. ही मुदत संपली असून यापुढे केबलसाठी देखील रस्ते खोदाईला परवानगी दिली जाणार नाही.
सीसी टीव्ही कॅमेरे योजनेसाठी बहुतांश काम पूर्ण झाले असून यापुढेही केबल टाकणे आवश्यक असेल, तर खोदाई टाळून रस्त्याच्या कडेने उपलब्ध असलेल्या पदपथांखालील डक्टमधूनच केबल टाकता येणार आहे.
सीसी टीव्हींच्या केबलसाठी खोदाईला यापुढे परवानगी नाही
सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या केबल टाकण्यासाठी महापालिकेतर्फे देण्यात आलेली वाढीव मुदत शुक्रवारी संपली. यानंतरही या कामासाठी केबल टाकायची असेल, तर...
First published on: 21-06-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv pmc limit digging road