वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर आता पोलीस सीसीटीव्हीच्या नियंत्रण कक्षातून नजर ठेवणार आहेत. नियमभंग करताना आढळलेल्या वाहनांच्या क्रमांकावरून त्यांना नोटीस पाठविली जाईल. सध्या शहराच्या काही भागात सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे चार कर्मचारी लक्ष ठेवण्याचे काम करीत आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी मंगळवारी दिली.
इंडियन एक्सप्रेसच्या वतीने आयोजित ‘आयडिया एक्सचेंज’ कार्यक्रमात आवाड यांनी ही माहिती दिली. पुण्याच्या

सारंग आवाड
सारंग आवाड

वाहतुकीसंदर्भात विचारलेल्या विविध प्रश्नांना आवाड यांनी थेट उत्तरे देत वाहतुकीचे प्रश्न आणि त्यावर करीत असलेल्या उपाययोजनांची या वेळी माहिती दिली. आवाड यांनी सांगितले, की पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. पोलिसांच्या ‘परिमंडल एक’मध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले असून इतर तीन विभागात सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. या सीसीटीव्हीचा नियंत्रण कक्ष पुणे पोलीस आयुक्तालयात आहे. या कक्षात बसूनच आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर वाहतूक पोलीस लक्ष ठेवणार आहेत. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाच्या क्रमांकावरून त्यांना कारवाईची नोटीस पाठविली जाणार आहे. त्यासाठी सध्या चार पोलीस कर्मचारी ही पाहणी करीत आहेत. त्यांना यासाठी प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. पूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविल्यानंतर ही योजना राबविण्यात येणार आहे.
देशातील मुंबई, दिल्ली या शहरांपेक्षा पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न नक्कीच वाईट आहे. पुण्यात दुचाकींची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. पुणे शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी शहराचे योग्य नियोजन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आणि वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करणे या गोष्टी करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्याची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी केल्यास शहराची वाहतूक नक्कीच सुधारण्यास मदत होईल, असे आवाड यांनी सांगितले.  
पुणे शहराची वाहतूक व्यवस्था बिघडणे याला पूर्णपणे शहर वाहतूक शाखा एकटीच जबाबदारी नाही. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचे काम वाहतूक पोलिसांचे आहे. पण, रस्ता योग्य असणे, सिग्नल व्यवस्थित असणे, शहराचे योग्य नियोजन करणे या जबाबदाऱ्या स्थानिक प्रशासनाच्या आहेत. त्यावर त्या भागातील वाहतूक ठरत असते. सर्वानी एकत्रित काम केल्यानंतर शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊ शकते, असे आवाड यांनी नमूद केले.
 ‘ट्रॅफिकॉप’ लवकरच सुरू होणार
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येक चालकाची नोंद ठेवणारी आणि राज्यात पुण्यात पहिल्यांदा सुरू केलेली ट्रॅफिकॉप ही योजना लवकरच सुरू केली जाणार आहे. पूर्वी ही योजना ब्लॅकबेरी मोबाइलवर सुरू होती. मात्र, आता स्मार्ट फोनवर ही योजना सुरू केली जाणार असून योजनेचे काम पूर्ण होत आले आहे. या ट्रॅफिकॉपमध्ये नवीन फीचर समाविष्ट करण्यात आली आहेत. या योजनेत सध्या वीस लाख वाहनांचा डेटा भरण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.

Story img Loader