फटाके वाजविल्याने प्रदूषण होते. त्यामुळे प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीने नागरिकांनी दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केले.
लोकमान्य टिळक प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारवाडय़ासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमान्य दिवाळी महोत्सवा’चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार विनायक निम्हण, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड, ‘केसरी’च संपादक डॉ. दीपक टिळक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष व महोत्सवाचे आयोजक रोहित टिळक, प्रणोती टिळक आदी त्या वेळी उपस्थित होते. महोत्सवाच्या निमित्ताने कामायनी व कोथरूड येथील पुणे अंधशाळेला मदतीचे धनादेश देण्यात आले. त्याचप्रमाणे पाच अपंगांना तीनचाकी सायकली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भेट देण्यात आल्या.
मुख्यमंत्री म्हणाले की, दिवाळीत खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू कमी किमतीत उपलब्ध व्हाव्यात म्हणून हा उपक्रम आहे. त्यातून दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल. दिवाळी किंवा गणेशोत्सव हे सण धार्मिकता म्हणून नव्हे, तर सर्व जाती- धर्माचे लोक एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात. त्यात राष्ट्रभावना व एैक्याचे प्रतीक असते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रोहीत टिळक म्हणाले की, प्रतिष्ठानच्या महोत्सवात यंदा ४६ स्टॉलधारकांनी भाग घेतला आहे. बाजारभावापेक्षा ३० ते ४० टक्क्य़ांनी कमी किमतीत वस्तू उपलब्ध होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा