शास्त्रीय संगीतातील दिग्गज कलाकारांचा सहभाग

पुणे : अभिजात संगीतातील प्रतिभासंपन्न गायक पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या प्रारंभानिमित्त शनिवारी (८ एप्रिल) मुंबईमध्ये दोन कार्यक्रमांची पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये शास्त्रीय संगीतातील दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे.कुमार गंधर्व प्रतिष्ठान आणि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स (एनसीपीए) यांच्या वतीने शनिवारपासून दोन दिवसांच्या ‘कालजयी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉइंट येथील एनसीपीएच्या टाटा थिएटर येथे शनिवारी सायंकाळी साडेपाचला होणाऱ्या कार्यक्रमात कुमारजींचे नातू भुवनेश कोमकली, नीलाद्री कुमार (सतार) आणि पं. उल्हास कशाळकर यांचा सहभाग आहे. एनसीपीएच्या एक्सपेरिमेंटल थिएटर येथे सकाळी दहाला होणाऱ्या परिसंवादामध्ये कथक नृत्यगुरू शमा भाटे, गायिका श्रुती सडोलीकर आणि कुमारजींचे शिष्य पं. सत्यशील देशपांडे सहभागी होणार आहेत. तर, टाटा थिएटर येथे सायंकाळी साडेपाचला होणाऱ्या कार्यक्रमात कुमारजींच्या कन्या कलापिनी कोमकली, पं. हरिप्रसाद चौरासिया यांचा सहभाग असून, पं. व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋत्विक फाउंडेशनतर्फे शनिवारी (८ एप्रिल) मुंबई येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे दुपारी तीनपासून होणाऱ्या विशेष कार्यक्रमात यज्ञेश रायकर आणि एस. आकाश यांची व्हायोलिन आणि बासरीवादनाची जुगलबंदी होणार आहे. त्यांना आदित्य कल्याणपूर तबल्याची आणि सुखद मुंडे पखवाजची साथसंगत करणार आहेत. त्यानंतरच्या सत्रात सायंकाळी साडेचारला ऋजुता सोमण यांचा कथक नृत्याविष्कार होणार आहे. त्यांना मनोज देसाई (संवादिनी), समीर पुणतांबेकर (तबला) आणि अबोली अभ्यंकर-थत्ते (पढंत) साथसंगत करणार आहेत.

‘मला उमजलेले कुमार गंधर्व’ या विषयावर पं. कुमार गंधर्व यांचे पुत्र पं. मुकुल शिवपुत्र यांच्याशी विजय कुवळेकर आणि प्रवीण कडले संवाद साधणार आहेत, तर ‘असे होते कुमारजी’ हा विषय पं. मुकुल शिवपुत्र आणि पं. सत्यशील देशपांडे या गुरूबंधूंच्या निरुपणातून उलगडणार आहे. पं. मुकुल शिवपुत्र यांच्या शास्त्रीय गायनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्यांना ज्ञानेश्वर सोनावणे (संवादिनी), सुनील जायफळकर (तबला), पल्लवी पोटे, संकेत भोजणे आणि श्रद्धा सावंत (तानपुरा) साथसंगत करणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे निवेदन करतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebration of two programs in mumbai on the occasion of kumar gandharva birth centenary amy
Show comments