पिण्याच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर; काँक्रिटीकरणाच्या तब्बल २५० ते ३०० कामांच्या निविदा मंजुरीच्या प्रतीक्षेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला जात असला, तरी पिण्याच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होणार असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. नागरिकांची मागणी नसतानाही गल्लीबोळात सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते करण्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा धडाका कायम राहिला असून रस्ते काँक्रिटीकरणाच्या तब्बल २५० ते ३०० कामांच्या निविदा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काहींना मंजुरी मिळाली असून रस्त्याच्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर होणार असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पात गेल्या वर्षीपेक्षा कमी साठा असल्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. त्यानुसार दिवाळीनंतर प्रतिदिन ११५० दशलक्ष लिटर पाणी महापालिकेला मिळणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र सर्वपक्षीय नगरसेवकांकडून होत असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये नगरसेवकांना प्रभागामध्ये विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, पदपथांची दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक बसविणे, विद्युत खांबांची उभारणी अशी कामे करण्यात येतात. या कामांपैकी रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यास नगरसेवकांकडून प्राधान्य दिले जाते. त्यासाठी अस्तित्वातील सुस्थितीतील डांबरी रस्ते उखडले जातात. रस्ते सिमेंट काँक्रिटचे करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत नाही. मात्र नागरिकांच्या नावाखाली गल्लीबोळात काँक्रिटीकरणाचे पेव फुटले आहे.

रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पाणी लागते. सध्या शहरात पाणीटंचाई आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे. गेल्या काही महिन्यात या कामांच्या निविदा प्रशासनाकडून काढण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून अडीचशे ते तीनशे कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

दरम्यान, रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या काही कामांना स्थायी समिती आणि महापालिकेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यामुळे ही कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर काही कामांच्या निविदा मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.

आयुक्त धाडस दाखविणार का?

दोन वर्षांपूर्वी शहरात पाण्याची समस्या गंभीर झाली असताना तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी रस्ते काँक्रिटीकरणाची कामे थांबविली होती. त्याला नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. सध्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव ही कामे थांबविण्याचा धाडसी निर्णय घेणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

पाणीकोटय़ात कपात झाल्यामुळे एक वेळ पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे गल्ली बोळातील काँक्रिटीकरणाच्या सर्व कामांना पाणीटंचाई दूर होईपर्यंत स्थगिती द्यावी.

– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cement concrete roads work in water scarcity
Show comments