कार्बन आणि आरोग्यासाठी घातक सूक्ष्मजीवांचा प्रसार रोखणे हे यंत्राचे वैशिष्टय़

पुणे : सॅनिटरी पॅड्सच्या विल्हेवाटीची समस्या सोडवण्यासाठी भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन इन्सिनरेटर या यंत्राची निर्मिती केली आहे. केंद्र सरकारने या यंत्राच्या डिझाइन पेटंटसाठी नुकतीच मान्यता दिली असून, या यंत्राद्वारे कार्बन आणि आरोग्यासाठी घातक सूक्ष्मजीवांचा प्रसार रोखणे हे या यंत्राचे वैशिष्टय़ आहे.

आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सहकार्याने हे संशोधन केले. यशवंतराव मोहिते महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. डॉ. भरत बल्लाळ, अंकुश जगदाळे, सुलग्ना दास, दिव्या चंद्रशेखरन हे पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी, गरवारे महाविद्यालयातील डॉ. प्रफुल्ल शेंडे, राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीच्या डॉ. रेणुका बल्लाळ यांनी या प्रकल्पासाठी काम केले. काही वर्षांपासून पर्यावरणाच्या दृष्टीने सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट ही समस्या निर्माण झाली आहे. विघटनासाठी शेकडो वर्षे लागतात. त्याशिवाय वापरून टाकलेल्या सॅनिटरी पॅड्समुळे आरोग्यासाठी घातक अशा सूक्ष्मजीवांचा प्रसार होतो. त्यामुळे जगभर सॅनिटरी पॅड्सच्या विल्हेवाटीचे संशोधन केले जात आहे. या संशोधनातून काही यंत्रांची निर्मितीही करण्यात आली आहे, मात्र सर्व यंत्रांपेक्षा इन्सिनरेटर हे यंत्र वेगळे असल्याचा दावा डॉ. बल्लाळ यांनी केला. ‘सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रांपैकी कोणतेही यंत्र प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, विल्हेवाटीच्या प्रक्रियेतील ड्रॉपलेट न्यूक्लिआय किंवा जैविक प्रसार रोखण्यासाठी सक्षम नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे त्यासाठी संशोधन करण्याची कल्पना पुढे आल्याचे बल्लाळ यांनी सांगितले.

उत्पादकांशी बोलणी सुरू

इन्सिनरेटर हे यंत्र कुठेही ठेवता येण्याजोगे आहे. त्यात एका वेळी पंचवीस पॅड्सची विल्हेवाट लावता येऊ शकते. हे यंत्र उपलब्ध करण्यासाठी काही उत्पादकांशी बोलणी सुरू आहेत. या विषयाची सामाजिक गरज लक्षात घेऊन उपलब्ध यंत्रांच्या निम्म्या किमतीत हे यंत्र देण्याचा प्रयत्न आहे, असेही डॉ. बल्लाळ यांनी स्पष्ट केले.

Story img Loader