पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेच्या विरोधात देशभरात १५ ठिकाणी छापेमारी करत एनआयएने आणखी १७० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याच दरम्यान देशविरोधी कारवाया आणि घोषणाबाजी केल्यामुळे पीएफआयवर केंद्र सरकारने पाच वर्षांकरिता बंदी घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील अलका टॉकीज चौकात मनसेने फटाके वाजवून आणि लाडू देऊन जल्लोष साजरा केला.
मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले की,पीएफआय ही देशविरोधी संघटना असून पुण्यातील आंदोलना दरम्यान, ज्या घोषणा देण्यात आल्या त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. या संघटनेवर बंदी आणावी आणि घोषणाबाजी करणाऱ्या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही जल्लोष साजरा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की, देशभरात अशा संघटना राहूच नयेत याबाबत सरकारने योग्य ती पावले उचलावीत अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.