पुणे: मोबाइल हरवल्यास ब्लॉक करणे, आपल्या नावावरील सिम कार्ड शोधणे आणि ऑनलाइन फसवणूक टाळणे यासाठी केंद्र सरकारने कृत्रिम प्रज्ञेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर सुरू केला आहे. कृत्रिम प्रज्ञेवर आधारित संकेतस्थळ सरकारने सुरू केले असून, तिथे नागरिकांना अनेक सुविधा मिळणार आहेत.
‘संचार साथी’चे उद्घाटन केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते मंगळवारी झाले. डिजिटल भारत योजनेंतर्गत हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. यात ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’च्या (सीईआयआर) माध्यमातून चोरीला गेलेले अथवा हरवलेले मोबाइल ब्लॉक करता येतील. आपल्या नावावर किती नोंदणीकृत मोबाइल सिम आहेत, याची माहिती नागरिकांना मिळवता येणार आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेशियल रेकग्निशन पॉवर्ड सोल्यूशन फॉर टेलिकॉम सिम सबस्क्रायबर व्हेरिफिकेशन’च्या (एएसटीआर) माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवता येणार आहे.
आणखी वाचा-‘हनी ट्रॅप’ प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत, दोन संशयित मोबाइल क्रमांक आढळले
या वेळी बोलताना वैष्णव म्हणाले की, मोबाईल फोनचा गैरवापर करून बनावट ओळख निर्माण करणे, बनावट केवायसी, बँक गैरव्यवहार यासारखे फसवणुकीचे प्रकार होऊ शकतात. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले. दूरसंचार विधेयकाच्या मसुद्यात वापरकर्त्यांची सुरक्षा हा देखील महत्त्वाचा भाग आहे. संचार साथी संकेतस्थळाद्वारे ४० लाखांहून अधिक बनावट मोबाइल दूरध्वनी कनेक्शनची ओळख पटली असून, आतापर्यंत ३६ लाखांहून अधिक कनेक्शन रद्द करण्यात आली आहेत.
संचार साथीद्वारे या गोष्टी करता येतील
-आपल्या नावावर असलेली नोंदणीकृत सिम तपासता येतील.
-फसव्या किंवा अनावश्यक सिमची तक्रार करता येईल.
-चोरीला गेलेले अथवा हरवलेले मोबाइल फोन ब्लॉक करता येतील.
-मोबाईल फोन विकत घेण्यापूर्वी त्याच्या आयएमईआय क्रमांकाचा खरेपणा तपासता येईल.