मंत्र्यांनी दुष्काळासाठी दौरे करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत दुष्काळासाठी केंद्राने दिलेली ७७८ कोटींची मदत अतिशय अपुरी असल्याने केंद्राने पाच हजार कोटींची मदत द्यावी, अशी मागणी रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये काही कार्यक्रमासाठी आलेल्या आठवले यांनी चिंचवडला पत्रकारांशी संवाद साधला. नेते दौऱ्यावर गेले नाही तरी टीका होते आणि गेल्यानंतरही तोच प्रकार होतो. वास्तविक दुष्काळामध्ये राजकारण करण्यापेक्षा सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना केला पाहिजे. राज्य सरकारचे जलसंधारणाचे नियोजन चुकले आहे. दुष्काळ कमी करण्यासाठी जलसंधारणाची कामे वाढविणे गरजेचे आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारचा नद्याजोड प्रकल्प पूर्ण झाला नाही, तो होणे आवश्यक होते. पाण्याची व चाऱ्याची तीव्र टंचाई असल्याने केंद्राने भरीव मदत करावी, असे ते म्हणाले. दुष्काळासह खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण तसेच पदोन्नतीत आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत १३ मार्चला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
आर्थिक दुर्बल सवर्णाना आरक्षण, बेरोजगारांना पाच हजाराचा भत्ता, दलित व महिला अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना, बलात्कार करणाऱ्या व्यक्तीवर समाजाने बहिष्कार टाकावा, त्यासाठी फाशीची तरतूद करावी, कंत्राटी पध्दत रद्द करावी आदी मागण्या त्यांनी केल्या. इंदापूर येथील गायकवाड खूनप्रकरणातील सूत्रधार शोधण्यासाठी सीआयडीकडून तपास व्हावा, त्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत व त्याच्या पत्नीला नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली.
‘मायावतीचे सरकार येणारच नाही’
महाराष्ट्रात बसपाचे सरकार आल्यास शाहू-फुले-आंबेडकर यांच्या स्मारकांसाठी २०० एकर जागा देऊ, अशी घोषणा मायावतीने नागपूर येथे केली. त्यासंदर्भात, पत्रकारांनी विचारणा केली असता, मायावतीचे महाराष्ट्रात सरकार येणारच नाही, अशी खात्री रामदास आठवले यांनी दिली. त्यांचे उत्तर प्रदेशात चांगले काम असून तेथे पुन्हा सत्ता आल्यास मायावतीने ५०० एकर जागेत स्मारकाची जरूर उभारणी करावी, त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. मात्र महाराष्ट्रात तसे स्मारक उभे करण्यासाठी मलाच मुख्यमंत्री व्हावे लागेल, असेही ते म्हणाले.‘भाजपकडील पिंपरी मतदारसंघ रिपाइंला हवा’
महायुतीत भाजपकडे असलेलापिंपरी विधानसभा मतदारसंघ आगामी जागावाटपात रिपब्लिकन पक्षाला मिळावा, अशी आपली आग्रही मागणी असून त्यासाठी उद्धव ठाकरे व गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. महायुतीकडे लोकसभेच्या ४ तर विधानसभेच्या ३५ जागांची मागणी करणार असून चर्चेत कमी-जास्त होऊ शकेल, असेही ते म्हणाले.पिंपरी शहराध्यक्षपदाचा वाद असल्याचे मान्य करत तो मिटवण्यासाठी प्रयत्न करू तसेच सदस्यनोंदणी करून येत्या दोन महिन्यात शहराध्यक्षपदाची निवडणूक घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. नेता होण्यापेक्षा कार्यकर्ते व्हा, अशी टिप्णीही त्यांनी केली.
‘दुष्काळासाठी केंद्राने पाच हजार कोटी द्यावेत’
मंत्र्यांनी दुष्काळासाठी दौरे करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत दुष्काळासाठी केंद्राने दिलेली ७७८ कोटींची मदत अतिशय अपुरी असल्याने केंद्राने पाच हजार कोटींची मदत द्यावी, अशी मागणी रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केली आहे.
First published on: 18-02-2013 at 10:26 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government should give five thousand crore for drought