पुणे : दिल्लीतील टोमॅटोची टंचाई, दरवाढ टाळण्यासाठी  केंद्र सरकार थेट टोमॅटो खरेदी करणार आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला (एनसीसीएफ) केंद्राने तातडीने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील बाजार समित्यांमधून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राची खरेदी वाढल्यास राज्यातील टंचाईत आणखी भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजार समित्यांमधून तत्काळ टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. खरेदी केलेला टोमॅटो दिल्ली आणि परिसरातील विक्री केंद्रातून सवलतीच्या दराने विकला जाणार आहे. शुक्रवार, १४ जूनपासून दिल्लीत सवलतीच्या दराने टोमॅटो विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. या  प्रकारामुळे महाराष्ट्रात आणखी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

टोमॅटोचे उत्पादन देशातील सर्व राज्यांमध्ये होते. एकूण टोमॅटो उत्पादनात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशाचा वाटा ५५ टक्क्यांहून जास्त आहे. राज्यनिहाय टोमॅटोचा कालावधी भिन्न आहे. तरीही टोमॅटो काढणीचा काळ डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात टोमॅटोचे उत्पादन कमी असते.  साधारणपणे जुलै महिन्यात देशभर पाऊस असतो. त्यामुळे टोमॅटोची काढणी, वाहतूक अडचणीची ठरते.

सातारा, नारायणगाव, नाशिकमधून खरेदी

महाराष्ट्रातून विशेषत: सातारा, नारायणगाव आणि नाशिकमधून खरेदी केली जाणार आहे. महाराष्ट्रातूनच गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांना पुरवठा होतो. आंध्र प्रदेशातील मदनापल्ली (चित्तूर) आणि कर्नाटकातील कोलारमधून खरेदी केली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातून लवकरच नवीन पिकांची आवक होणे अपेक्षित आहे. शिवाय, ऑगस्टमध्ये नारायणगाव आणि औरंगाबाद पट्टय़ातून अतिरिक्त पुरवठा होणे अपेक्षित असल्यामुळे नजीकच्या काळात दर कमी होण्याची केंद्राला अपेक्षा आहे.

सातारा, नारायणगाव आणि नाशिकमध्ये उत्पादित होणारा टोमॅटो मुंबई, पुण्यासह देशभरात जातो. केंदाने तातडीने मोठय़ा प्रमाणावर खरेदी सुरू केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होईल. राज्यातील टोमॅटोच्या टंचाईत आणि दरात भर पडेल. कर्नाटक आणि दक्षिणेकडील राज्यातून होणारी टोमॅटोची आवक थंडावली आहे.

– विलास भुजबळ, माजी अध्यक्ष अडते संघटना, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, पुणे</strong>

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government to buy tomatoes to avoid shortage in delhi and price hike zws