पुणे : केंद्र सरकारकडून ‘उडान’ योजनेंतर्गत हवाई वाहतुकीद्वारे शहरे जवळ आणण्याचा प्रयत्न केला जात असताना पुण्यातून विमानसेवेला प्रतिसाद वाढत आहे. मात्र, पुण्यातून उड्डाणासाठी अद्यापही राज्यातील नऊ विमानतळे प्रतीक्षेत आहेत.
पुणे विमानतळावरून ३५ शहरे विमानसेवेने जोडली गेली आहेत. त्यात दुबई, सिंगापूर आणि बँकॉक अशा तीन आंतरराष्ट्रीय शहरांचा समावेश आहे. पुण्याहून मुंबई, नागपूर, जळगाव, चिपी, नांदेड या ठिकाणी विमानसेवेला प्रतिसाद वाढत आहे. पुणे ते सोलापूर आणि अमरावती विमानसेवा सुरू झाली होती. मात्र, तांत्रिक कारणास्त या विमानतळांवरून नागरी उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. याशिवाय अकोला (शिवणे), यवतमाळ, लातूर, चंद्रपूर, गोंदिया, धाराशिव, धुळे ही शहरे अद्याप हवाई वाहतुकीपासून दूरच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्ते, रेल्वे वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. या शहरांंतून विमानसेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
देशांतर्गत हवाई वाहतूक वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात १२० नवीन शहरांंना जोडण्याची सुधारित ‘उडान’ योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमरावती विमानतळाचे पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सोलापूरच्या विमानतळाचा काही महिन्यांपूर्वी आरंभ झाला. अकोला येथील विमानतळही चांगल्या स्थितीत असून, तेथे सुविधा उपलब्ध केल्यास विमानसेवा सुरू होऊ शकते. मात्र, या शहरांसह नऊ प्रमुख शहरांंतून हवाई वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही.
हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातून शिक्षण, नोकरीनिमित्त अनेक जण पुणे आणि पिंपरी-चिंचवड, मुंबईमध्ये राहत आहेत. या नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी हवाई सेवा नसल्याने रस्ते किंवा रेल्वे मार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे या विमानतळांवरून ‘उडान’ योनजेंतर्गत हवाई उड्डाणे सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात आली आहे.’
‘पुणे विमानतळावरून ३५ शहरे विमानसेवेने जोडली आहेत. त्यात दुबई, सिंगापूर आणि बँकॉक अशा तीन आंतरराष्ट्रीय शहरांचा समावेश आहे. पुण्यातून राज्यातील मुंबई, नागपूर, जळगाव, चिपी, नांदेडसाठी विमानसेवा आहे. उर्वरित शहरांसाठी विमानसेवा नसल्याने पुण्यातून मूळगावी ये-जा करण्याला नागरिकांवर मर्यादा येतात. रेल्वे प्रवासात नागरिकांचा भरपूर वेळ वाया जातो. तिकीट मिळत नसल्याने नागरिकांना जादा दराने तिकीट काढावे लागते. त्यामुळे नागरिकांचे पैसे आणि वेळ दोन्ही खर्च होत आहेत. ‘उडाण’अंतर्गत विमान सेवा सुरू केली, तर शहरे पुण्याशी जोडली जाऊन उद्योगांना, आर्थिक विकास होण्यासही मदत होईल,’ असेही त्यांनी सांगितले.
‘लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार होत असून प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन शहरातील विमानतळांच्या बाबतीत विमान कंपन्यांसोबत व्यावहारिक अनुषंगाने चर्चा सुरू आहे. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाच्या (डीजीसीए) निर्णयानुसार विमानांच्या उड्डाणांची कार्यवाही करण्यात येईल.
- संतोष ढोके, संचालक, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ
‘शिक्षणासाठी अमरावती येथून आले असून सुटीच्या काळात मूळगावी जाण्यासाठी रेल्वेने जावे लागते. हवाई सेवा सुरू झाल्यास कमी कालावधीत आणखी सहज आणि सुलभ प्रवास होईल.’
- अपेक्षा देवळगावकर, प्रवासी
अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या पायलट प्रशिक्षण केंद्रासाठी एअर इंडियातर्फे १० एकर जागेत विस्ताराचे कामकाज सुरू आहे. सोलापूर विमानतळावरून ‘उडान’ सेवेंतर्गत विमानांचे उड्डाण होऊ शकते. या विमानतळांवरून विमानसेवा सुरू करण्याबाबत स्थानिक विमान प्रशासन आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ
शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावरील शिवणे विमानतळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. या ठिकाणी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा असून जागेच्या भूसंपादनासाठी २०० कोटींहून अधिक निधीची आवश्यकता आहे. राज्याच्या अधिवेशनामध्ये आतापर्यंत चार वेळा लक्षवेधी मांडण्यात आली. मात्र, याबाबत कोणताच निर्णय होत नसल्याने या विमानतळावरील नागरी उड्डाणांची सेवा बंद आहे.
- रणधीर सावरकर, आमदार, अकोला पूर्व मतदारसंघ
सोलापूर विमानतळाच्या जागेबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार आणि हवाई कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे. विमानसेवा कधी सुरू होईल याबाबत सांगता येणे शक्य नाही.
- चंद्रनरेश वन्झारा, संचालक, सोलापूर विमानतळ