लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : अन्नधान्यांची वाढती महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकार रशियातून गहू आयात करण्याचा विचार करीत आहे. आगामी काळात सुमारे ४० लाख टन गव्हाचा तुटवडा निर्माण होणार असल्याने केंद्र सरकारकडून सुमारे ९० लाख टन गहू आयात करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अन्नधान्य, कडधान्ये आणि पालेभाज्यांच्या दरात झालेल्या वाढीमुळे जुलै महिन्यात महागाईचा दर ७.४४ टक्क्यांवर गेला आहे. महागाईचा दर सव्वा वर्षांतील उच्चाकांवर पोहचला आहे. प्रामुख्याने कमी, हलक्या दर्जाच्या गव्हाच्या किंमतीत प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. २८ रुपये किलो दराने मिळणारा गहू ३० ते ३१ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. चांगल्या दर्जाचा म्हणजे ३२ ते ४० रुपये प्रति किलो दराने विकल्या जाणाऱ्या गव्हाचे दर जैसे-थे आहेत, सर्वसामान्यांकडून मागणी असलेल्या कमी दर्जाच्या गव्हाची मात्र दरवाढ झाली आहे. कमी दर्जाचा गहू मिल चालक गव्हाचे पीठ, रवा, मैदा तयार करण्यासाठी वापरतात, त्यांनाही कमी किंमतीच्या गव्हाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे केंद्र सरकार रशियाकडून कमी दर्जाच्या गव्हाची आयात करण्याचा विचार करीत आहे.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘इतकी’ पदे होणार निर्माण; लवकरच नोकर भरती
अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांनी केंद्राचा रशियाकडून गव्हू आयात करण्याचा कोणताही विचार नसल्याचे जुलैअखेरीस स्पष्ट केले होते. त्यानंतर आयातीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सुमारे ४० लाख टन गव्हाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सुमारे ९० लाख टन गहू आयात करण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चेला सरकारी पातळीवरून उद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.
रशियात कमी दर्जाच्या गव्हाचे उत्पादन होते. हा गहू प्रामुख्याने मिल व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर वापरतात. आता आयात होणारा गहूही कमी दर्जाचा आणि कमी किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. साधारणपणे २५ रुपये प्रति किलो दराने हा गहू भारतात दाखल होईल. ग्राहकांना तो २७ ते २८ रुपये दराने उपलब्ध होऊ शकतो. ही आयात सरकार ते सरकार होणार की, व्यापारी ते व्यापारी, असा होणार या बाबत अद्याप कोणतीच स्पष्टता नाही, अशी माहिती गव्हाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली.
आणखी वाचा-पुणे : ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड
फक्त चर्चा सुरू…
मागील पंधरा दिवसांपासून रशियातून गहू आयात केला जाणार, अशी फक्त चर्चा सुरू आहे. सध्या मिल चालकांना मिलसाठी लागणाऱ्या गव्हाचा तुटवडा जाणवत आहे. सरकार अन्न महामंडळामार्फत उपलब्ध करून देत असलेला गहू अपुरा आहे. रशियातून गहू आयात केल्यास दरवाढ नक्कीच आटोक्यात येईल. बाजारात गहू, गव्हाचे पीठ, रवा, मैद्याची उपलब्धता चांगली राहील, असे गहू प्रक्रिया उद्योजक अनुप शहा यांनी सांगितले.