लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश आणि विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राने राज्यातील पुणे, नाशिक विमानतळांसह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना २.०’ अंतर्गत समावेश केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या उत्पादनाला जगभरात ओळख मिळणार आहे. पुणे विमानतळाचा समावेश झाल्याने पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, नगर, रायगड अशा आसपाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन दूरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, या उद्देशाने ऑगस्ट २०२० मध्ये ‘कृषी उडान’ योजना सुरु करण्यात आली. आता ‘कृषी उडान योजना २.०’ ही घोषणा २७ ऑक्टोबरला करण्यात आली. पुणे विमानतळाचा या योजनेत समावेश झाल्याने पुण्यासह आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचवता येणार आहे. पर्यायाने त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकणार आहे.
आणखी वाचा- अजितदादांचा आमदार असलेल्या पिंपरीवर भाजपचा डोळा? घेतला ‘हा’ निर्णय
पुणे विमानतळावरून विविध प्रकारचा शेतीमाल (फळे, भाज्या, मांस, मासे, डेअरी उत्पादने इत्यादी) देशाच्या विविध कानाकोपऱ्यांत आणि परदेशातही पाठविण्यात येणार आहेत. ही योजना कृषी विभाग, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, पशुपालन आणि डेअरी विभाग, मत्स्य विकास विभाग, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, वाणिज्य विभाग, आदिवासी विकास मंत्रालय आणि पूर्वोत्तर प्रदेश विकास मंत्रालय अशी आठ केंद्रीय मंत्रालये योग्य समन्वय साधून राबविणार आहेत. तसेच हवाई मालवाहतुकीद्वारे ही उत्पादने पाठविताना विमानतळ शुल्क, पार्किंग शुल्क यामध्ये सवलत देण्यात येणार आहे.