पुणे: दिवाळीसह इतर सणांनिमित्त मध्य रेल्वेकडून ५०० विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने हे नियोजन केले आहे.
सणासुदीच्या काळात रेल्वेला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून ५०० विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. यामुळे नेहमीच्या गाड्यांव्यतिरिक्त अंदाजे २६ लाख अतिरिक्त प्रवाशांची सोय होणार आहे. यातील ५३ विशेष गाड्या शुक्रवारी (ता.१०) तर ४६ विशेष गाड्या शनिवारी (ता.११) धावल्या.
हेही वाचा… १९ कोटींची शिष्यवृत्ती वितरित; पाचवी-आठवीतील ३२ हजार ६६७ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
विशेष गाड्यांतून दररोज अतिरिक्त ७.५० लाख प्रवाशांची वाहतूक होत आहे. रेल्वेचे कर्मचारी सणासुदीच्या काळात सुटी न घेता काम करीत असल्याने हे शक्य झाले आहे. त्यात रेल्वे चालक, व्यवस्थापक, नियंत्रक, स्टेशन मास्तर, तिकीट तपासनीस, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी, तिकीट आरक्षण कर्मचारी, लोहमार्गांची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.