राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यांनी ‘मेट्रो’ला निधी देताना राजकारण केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मुंबईनंतर खऱ्या अर्थाने मेट्रोची गरज पुणे शहराला होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
िपपरी पालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ अजितदादांच्या हस्ते झाला, तेव्हा शहरातील विकासकामांचा आढावा घेतानाच मेट्रोप्रकरणी सरकारने दोन्ही शहरांवर अन्याय केल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. पवार म्हणाले, साहेब दिल्लीत होते, ‘मेट्रो’साठी त्यांची मोठी मदत होत होती. सत्ताबदल झाल्यानंतर केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आले आहे. मात्र, ‘मेट्रो’साठी त्यांनी म्हणावी तशी तरतूद केली नाही. मुंबईनंतर ‘मेट्रो’ची खरी गरज पुणे-िपपरी-चिंचवडला आहे. मात्र, तसे झाले नाही. पुणे ‘मेट्रो’ला आवश्यकतेनुसार निधी देण्यात आला नाही. दोन्ही शहरांची लोकसंख्या झपाटय़ाने वाढते आहे. एकटे िपपरी-चिंचवड शहर २० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे कमी निधी देत ‘मेट्रो’त राजकारण झाले आहे, हे नाकारता येणार नाही, असे ते म्हणाले. ‘साहेब’ दिल्लीत आम्ही राज्यात, दोन्हीकडून सहकार्य मिळाल्याने केंद्राचा निधी मिळाला, त्यामुळे शहरात भरीव विकासकामे होऊ शकली. मावळातील बंद नळयोजना प्रकल्प बंद आहे, तो पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. दुसऱ्याला त्रास होणार नाही, अशाप्रकारे तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. विकासकामे करताना दर्जा राखावा, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central state govt metro politics