भारतातील जर्मन भाषेच्या शिक्षणाला २०१४ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्त पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातर्फे जर्मन भाषा शिक्षणाचा शतकोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. शिक्षणशास्त्र विषयातील संशोधन आणि शिक्षणासाठी जर्मनी बरोबर करार करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. गाडे यांनी या वेळी दिली.
या वेळी परकीय भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मंजिरी परांजपे, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे प्रमुख डॉ. व्ही. बी. गायकवाड उपस्थित होते. शिक्षणशास्त्र विषयातील संशोधन आणि शिक्षणासाठी जर्मनीतील विद्यापीठांबरोबर करार करण्याच्या प्रयत्नामध्ये सध्या विद्यापीठ असून पुढील महिन्यामध्ये जर्मनीतील विद्यापीठांतील तज्ज्ञ पुणे विद्यापीठाला भेट देणार आहेत. याबाबत डॉ. गाडे यांनी सांगितले, ‘‘आपल्याकडे शिक्षणशास्त्र हा विषय थोडा ढोबळमानाने शिकवला जातो. मात्र, जर्मनीमध्ये प्रत्येक विषयाला अनुरूप अशी तो विषय शिकवण्याची पद्धत आहे. त्यामुळे प्रत्येक विषय शिकवणारे तज्ज्ञ हे वेगळे असतात. या पद्धतीनुसार आपल्याकडील शिक्षणशास्त्र विषयाचा विचार करता येऊ शकतो का या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.’’
जर्मन भाषाशिक्षणाच्या शतकोत्सवानिमित्त परकीय भाषा विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १९१४ साली जर्मन भाषा शिकवण्याची सुरुवात झाली. त्याचवर्षी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि रँग्लर परांजपे यांच्या पुढाकाराने फग्र्युसन महाविद्यालयामध्ये जर्मन विभागाची स्थापना झाली. त्या वेळी ग्रीक आणि लॅटीन भाषा शिकण्याला पर्याय म्हणून जर्मन भाषेकडे पाहिले जात होते. आज पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्य़ांमध्ये जर्मन भाषेचे शिक्षण मिळू शकते. जर्मन चित्रपट महोत्सव, जर्मन भाषा आणि साहित्य यांच्या अभ्यासावर आंतरराष्ट्रीय परिषद, तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा, नाटय़ महोत्सव, जर्मन शिकवण्याच्या पद्धतींवर चर्चासत्रे, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, प्रदर्शने असे कार्यक्रम होणार आहेत. या कालावधीमध्ये पुण्यातील जर्मन शिक्षणावर लघुपटाची निर्मिती केली जाणार आहे. त्याचबरोबर शतकोत्सवानिमित्त विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. शतकोत्सवाचे उद्घाटन २३ फेब्रुवारी रोजी होणार असून डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईमध्ये समारोप होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा