पुणे : कृषी विभागाच्या या पुढील सर्व बैठकांना तृणधान्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचाच अल्पोपाहार देण्यात येईल. हा अल्पोपाहार बचत गटांच्या महिलांनी तयार केलेला असेल आणि त्यांना त्या पदार्थांचा व्यावसायिक दराने मोबदलाही दिला जाईल, अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.
यंदापासून मकर संक्रांत-भोगीचा दिवस राज्यात तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयाच्या परिसरात बाजरी या तृणधान्यापासून बनविण्यात आलेल्या विविध पाककृतींची स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्धाटन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांच्यासह विविध विभागांचे संचालक उपस्थित होते.
हेही वाचा >>> पुण्याच्या नामांतरावरून अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, “पुणे म्हणजे मिनी…”
चव्हाण म्हणाले,की पौष्टिक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच तृणधान्याचा आहारांमध्ये समावेश करण्यासाठी सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने राज्य शासनाने ‘मकर संक्रांती- भोगी’ हा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिवस’ म्हणून घोषित केला आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून तृणधान्यांचे आहारातील महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वातावरणीय बदल, आहारात बदल झाल्याने नागरिकांना कर्करोग, मधुमेह, श्वसनाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून नागरिकांनी आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे वळण्याची गरज आहे, असेही चव्हाण म्हणाले.
प्रदर्शनात देशभरातील खाद्यपदार्थांची मेजवानी
प्रदर्शनात एकूण १५ स्टॉल लावण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक विभागांसह, गुजरात, राजस्थानमध्ये बाजरीपासून तयार करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांचा समावेश होता. बाजरीपासून केलेले लाडू, हलवा, बर्फी, वडी, थालीपीठ, शिरा, उपमा, उसळ, पोहे, चिवडा, चकली, धपाटे, पाणीपुरी, केक,बेबडी, कोरके,खारवडेस, कुकीज, खारोळ्या, इडली, कापण्या, भरलेली मिरची असे सुमारे ७५ हून अधिक प्रकारचे पदार्थ ठेवण्यात आले होते.