भक्ती बिसुरे
पुणे : भारतात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे (सर्व्हायकल कॅन्सर) प्रमाण जगातील सर्वात चिंताजनक असून दर पाच रुग्णांपैकी एक किंवा सुमारे २१ टक्के रुग्ण भारतात असल्याची माहिती नुकतीच लॅन्सेट या जगप्रसिद्ध नियतकालिकाने समोर आणली आहे. या कर्करोगाने होणाऱ्या जगातील चारपैकी एक म्हणजे सुमारे २३ टक्के मृत्यू भारतात होतात, असेही या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेत्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या २०२० मधील माहितीतून हा तपशील समोर आला असून दरवर्षी जगातील सुमारे सहा लाख नवीन महिलांना या कर्करोगाचा त्रास होतो. त्यांपैकी ५८ टक्के रुग्ण आशियामध्ये आहेत. त्यापाठोपाठ आफ्रिकेत २० टक्के, युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रत्येकी १० टक्के रुग्ण आहेत. सुमारे ५८ टक्के मृत्यूही आशियामध्येच होत असून आफ्रिकेत हे प्रमाण २२ टक्के आणि लॅटिन अमेरिकेत ते सुमारे नऊ टक्के एवढे आहे. आशियातील रुग्णसंख्येपैकी २१ टक्के रुग्णसंख्या भारतात तर उर्वरित १८ टक्के रुग्णसंख्या चीनमध्ये आहे. भारत, ब्राझिल, थायलंड आणि पोलंड यांसारख्या देशांमध्ये प्रजनन दर कमी झाल्यामुळे तसेच चाचण्या आणि उपचारांचे पर्याय वाढत असल्यामुळे मृत्युदरात घट असल्याची दिलासादायक माहितीही या अहवालात नमूद करण्यात आली आहे.
ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाच्या विषाणूमुळे हा कर्करोग होतो. योनीमार्गातील संसर्ग, स्वच्छतेच्या सवयींचा अभाव अशा कारणांमुळे या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. लहान वयापासून आलेले शारीरिक संबंध किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींशी आलेले संबंध, धूम्रपान, अनेक बाळंतपणे अशी पूरक कारणेही हा कर्करोग होण्यामागे आहेत. ४० ते ५० वर्षे वयोगटात याची लक्षणे दिसली असता त्याची सुरुवात काही वर्षे आधीच झालेली असण्याची शक्यता असते. इतर बहुतांशी कर्करोगांप्रमाणे हा कर्करोगही प्राथमिक अवस्थेत लक्षात आला आणि त्याचे निदान झाले तर पूर्ण बरा होऊ शकतो. विशेष म्हणजे पॅप स्मिअर नावाच्या चाचणीद्वारे हा कर्करोग होण्याची शक्यताही पडताळून पाहता येते.
संपूर्ण प्रतिबंध शक्य
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जगातील सर्व देशांमध्ये महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. मात्र, या प्रकारच्या कर्करोगाचे कारण माहिती असल्यामुळे त्याला संपूर्ण प्रतिबंध करणे शक्य आहे. ज्या देशांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत त्या देशांमध्ये आता या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट दिसत आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील पहिली भारतीय लस सीरम इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात येत असून या लशीला केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे केवळ भारतातील नव्हे तर जगातील महिलांसाठी अत्यल्प दरात ही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.