लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार १८ ते २० मार्चदरम्यान पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी, तर ४ एप्रिल रोजी पदवी प्रवेशासाठीची समाइक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून, अर्ज करण्यासाठी ३ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. एम. व्ही. रासवे यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठात ५२ शैक्षणिक विभागांसह नगर आणि नाशिक उपकेंद्रे आहेत. राज्यभरातील विद्यार्थ्यांसह परराज्यांतील, परदेशांतील विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. समाइक प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण, तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दोन तासांच्या प्रवेश परीक्षेत शंभर गुणांची प्रश्नपत्रिका असते. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते.

पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांसह व्यावसायिक, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, ललित कला, उपयोजित विज्ञानातील अनेक अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. प्रवेशप्रक्रिया आणि प्रवेश परीक्षेबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Story img Loader