पुणे : शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले. त्यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषि पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटी ९ ते २७ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पिंपरी : प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या; प्रेयसीसह योगा प्रशिक्षकाविरोधात गुन्हा

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यासाठी सीईटी सेलकडून १९ परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांतील गुणांच्या आधारे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास, नियोजन करणे शक्य होते. सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार एमएचटी सीईटी या परीक्षेअंतर्गत ९ ते १७ एप्रिल या कालावधीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) या गटासाठीची, तर १९ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीबी) या गटासाठीची परीक्षा घेतली जाणार आहे. डीपीएन-पीएचएन अभ्यासक्रमासाठीची सीईटी ८ एप्रिल, परिचारिका (नर्सिंग) अभ्यासक्रमासाठीची सीईटी ७ आणि ८ एप्रिल रोजी होणार आहे. 

हेही वाचा >>> विधानसभेच्या अपयशानंतर मनसेने उचलले मोठे पाऊल ? पुण्यात होणार ‘आत्मचिंतन’ बैठक, राज ठाकरे घेणार  कठोर निर्णय !

बीबीए, बीबीएम, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांसाठीची सीईटी १ ते ३ एप्रिल या कालावधीत, डिझाइन पदवी (बी.डिझाइन) अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा २९ मार्च रोजी घेतली जाणार आहे. बीए. बीएड, बीएस्सी. बीएस चार वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम,  बीएड. एम.एड तीन वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रम, हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमासाठीची सीईटी २८ मार्च रोजी होणार आहे. शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम, हॉटेल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीची सीईटी २७ मार्च रोजी, बीएड. (जनरल अँड स्पेशल) बीएड एलसीटी अभ्यासक्रमासाठीची सीईटी २३ ते २५ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. एमसीए अभ्यासक्रमासाठीची सीईटी २३ मार्च, तीन वर्षे मुदतीच्या विधी अभ्यासक्रमासाठीची सीईटी २० आणि २१ मार्च रोजी, एमबीए एमएमएस सीईटी  १७ ते १९ मार्च, शारीरिक शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी, शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी १६ मार्च होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cet cell announces possible schedule for various entrance exams pune print news ccp 14 zws