शिरूर येथील टोलनाका प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग व या विभागाचे मंत्री छगन भुजबळ तसेच अशोका इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी हा आदेश दिला.
रस्त्याचे मोठय़ा प्रमाणावर काम शिल्लक असताना शिरूर येथील टोलनाक्यावर टोलची वसुली केली असून, ही वसुली बेकायदा असल्याबद्दल क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी शिरूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात खासगी फौजदारी खटला दाखल केला होता. यामध्ये न्यायालयाने १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम खाते आणि अशोका इन्फ्रास्टक्चर यांच्याकडून सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले. तिघांनी वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. सत्र न्यायाधीश विनय जोशी यांनी या तीन ही याचिका फेटाळून लावत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला. फिर्यादीकडून अॅड. डी. एस. भोपे यांनी काम पाहिले.