रोजच होणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने सध्या पोलिसांच्या गुन्हे विभागाने या गुन्ह्य़ाकडे सर्वाधिक लक्ष दिले असल्याने अनेक गुन्हे उजेडात येत आहेत. या वर्षी जानेवारी महिन्यापासून घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांचा पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला असून, त्यानुसार ठरावीक वार व वेळांना सर्वाधिक सोनसाखळी चोऱ्या होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे पन्नास वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या महिला चोरटय़ांकडून लक्ष्य होत असल्याचे दिसून येत आहे.
मोटारसायकलवरून येणारे चोरटे शहराच्या कोणत्याही भागामध्ये रस्त्याने एकटी पायी जात असलेल्या महिलेच्या जवळ येतात व काही कळण्यापूर्वी महिलेल्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून क्षणात पोबारा करतात. अशा प्रकारच्या घटना शहरात दररोज होत आहेत. त्यामुळे कोणत्याही वारी व कोणत्याही वेळेला अशा प्रकारची घटना घडते. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी जानेवारीपासून शहरात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांची वार, वेळा व वयोगटानुसार माहिती दिली. जानेवारीपासून सोनसाखळी चोरीचे ३९७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील २५१ गुन्हे उघडकीस आले आहेत. सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीती असल्याने हे गुन्हे रोखण्याला सध्या प्रथम प्राधान्य देण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जानेवारीपासून शहरात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना वार, वेळा व वयोगटानुसार अभ्यास केल्यास कोणत्याही वारी या घटना घडतात, पण रविवार व गुरुवारी सर्वाधिक घटना घडत असल्याचे दिसते. फिर्यादीच्या वयानुसार पाहिल्यास ५१ ते ६० या वयोगटातील महिलांबाबत या घटना मोठय़ा प्रमाणात असल्या, तरी साठ वर्षे वयाच्या पुढील ज्येष्ठ महिला चोरटय़ांकडून सर्वाधिक लक्ष्य केल्या जात आहेत. घटनांच्या वेळा पाहिल्या तर पहाटे पाच ते रात्री नऊच्या पुढे कोणतीही वेळ चोरटय़ांनी सोडलेली नाही. सकाळी नऊ ते दुपारी एक व दुपारी एक ते संध्याकाळी पाच या वेळेत अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, संध्याकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत सर्वाधिक घटना घडल्या आहेत.
जानेवारीपासूनच्या सोनसाखळी चोऱ्या
– वारांनुसार घटना
– सोमवार- ३२
– मंगळवार- ४८
– बुधवार- ४२
– गुरुवार- ७७
– शुक्रवार- ५१
– शनिवार- ६७
– रविवार- ८०
फिर्यादीच्या वयोगटानुसार
– १ ते २० वर्षे- ३
– २१ ते ३० वर्षे- २९
– ३१ ते ४० वर्षे- ७२
– ४१ ते ५० वर्षे- ६६
– ५१ ते ६० वर्षे- ९३
– ६० व त्यापुढील- १३३
वेळेनुसार घटना
– पहाटे ५ ते सकाळी ९- ४८
– सकाळी ९ ते दुपारी १- ९०
– दुपारी १ ते संध्या. ५- ९१
– संध्या. ५ ते रात्री ९- १२९
– रात्री नऊच्या पुढे- ३९.

Story img Loader