रस्त्याने पायी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकविण्याच्या घटना सातत्याने होत असताना कोंढवा येथे सोसायटीच्या लिफ्टमध्ये येऊन महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकविण्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. त्यामुळे आता रस्त्यांवर सोनसाखळ्या हिसकावणारे चोरटे सोसायटय़ांमध्येही महिलांना लक्ष्य करीत असल्याचा गंभीर मुद्दा या घटनेतून समोर आला आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये मागील काही वर्षांपासून सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. सोनसाखळी चोरांना रोखण्याचा मुद्दा पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेऊन विविध उपाययोजना केल्या. सातत्याने सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असलेल्या भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आली. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करून तपासणीही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे खबऱ्यांमार्फत माहिती काढून सोनसाखळी चोरांना पकडण्यात येत आहे. या उपायांतून अनेक चोरांना पोलिसांनी पकडले. त्यांनी चोरलेले सोने महिलांना समारंभपूर्वक परतही देण्यात आले. मात्र, त्यानंतरही शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना घडतच आहेत व या गुन्ह्य़ांमध्ये सातत्याने नवे आरोपी समोर येत आहेत.
कोंढव्यातील विष्णू विहार सोसायटीमध्ये शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास साठ वर्षे वयाची महिला लिफ्टमध्ये शिरल्यानंतर पाठोपाठ अज्ञात चोरटाही शिरला. त्यानंतर त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसका देऊन तोडली व चोरटा पसार झाला. याबाबत मार्केटयार्ड पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे.
दुचाकीवरून येणारे दोघे रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या जवळ येतात व काही कळण्यापूर्वीच दुचाकीवर मागे बसलेला चोरटा महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी तोडतो. त्यानंतर क्षणार्धात दोघेही चोरटे तेथून भरधाव निघून जातात. शहरातील घटलेल्या सर्वच घटनांमध्ये सोनसाखळी चोरांची चोरीची पद्धत एकच होती. ही पद्धत लक्षात घेता पोलिसांकडून संशयित दुचाकीस्वारांची तपासणी व प्रमुख भागात नाकाबंदी करण्यात येते. मात्र, सोसायटीच्या लिप्टमध्ये येऊन महिलेची सोनसाखळी हिसकावून नेण्याची घटना घडल्याने या चोऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच सोसायटय़ांनाही याबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे.

Story img Loader