बनावट चावीचा वापर करून आधी एखादी वेगवान दुचाकी चोरायची व याच दुचाकीचा वापर करून शहरात विविध ठिकाणी प्रामुख्याने वृद्ध महिला हेरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार व्हायचे.. कुणी पाठलाग केल्यास त्याला अडथळा करण्यासाठी वेगळीच यंत्रणा कार्यरत ठेवायची.. अशा प्रकारे सोनसाखळ्या हिसकाविण्याचे गुन्हे करणारे तीन चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्याकडून ७४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत.
मागील काही दिवसांमध्ये पुणे व िपपरी-चिंचवड शहरामध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकविण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. रोजच दोन ते तीन गुन्ह्य़ांची त्यात भर पडते आहे. त्यामुळे पोलिसांसाठीही ही डोकेदुखी ठरली आहे. ठरावीक ठिकाणी गस्त, नाकेबंदी आदी विविध उपाययोजना करून हे गुन्हे आटोक्यात आणण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून सोनसाखळी चोरीतील तीन आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत.
महिला साहाय्य कक्षाच्या पोलीस निरीक्षक प्रतिमा जोशी यांना मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र ऊर्फ राहुल ज्ञानेश्वर रावडे (वय ३०, रा. दांडेकर पूल, पुणे), किरण ऊर्फ खन्ना चंद्रकांत कुंभार (वय २२, रा. खानापूर, ता. हवेली), आतीश प्रकाश बाईत (वय २१, रा. मीठानगर, कोंढवा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीमध्ये सोनसाखळी चोरीतील गुन्ह्य़ांचा उलगडा झाला. आरोपींनी शहरातमध्ये विशेषत: वृद्ध महिलांना लक्ष करून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसका मारून तोडून नेल्याचे व त्यासाठी प्रसंगी संबंधित महिलेला खाली पाडून दागिने हिसकावल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारचे २५ गुन्हे उघडकीस आले आहेत. हे गुन्हे करण्यासाठी आरोपींनी चोरीच्या दुचाकी वापरल्या. डेक्कन, कोथरूड, दत्तवाडी, वारजे माळवाडी, सिंहगड रस्ता, अलंकार, विश्रांतवाडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये या आरोपींनी गुन्हे केले.
अत्यंत नियोजनपूर्व आरोपींनी हे गुन्हे केले असल्याचेही स्पष्ट झाले आहे. एखादी महिला हेरल्यानंतर रावडे व कुंभार हे दोघे दुचाकीवरून प्रत्यक्ष सोनसाखळी हिसकविण्याचा गुन्हा करीत होते. या सर्व प्रकारावर तिसरा आरोपी बाईत हा एका दुसऱ्या मोटारसायकलवर बसून लक्ष ठेवत होता. गुन्हा करून दुचाकीवरून पळून जाताना रावडे व कुंभार यांचा कुणी पाठलाग केल्यास त्यांना वेगवेगळ्या प्रकारे अडथळा निर्माण करण्याचे काम बाईत करीत होता. चोरलेले दागिने व मोटारसायकली अशा एकूण २१ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी या प्रकरणात जप्त केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार, प्रतिभा जोशी, सुनील ताकवले, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बाबर, उपनिरीक्षक सुधीर साकोरे, प्रकाश अवघडे, सहायक फौजदार सिकंदर जमादार, अशोक भोसले, स्टिव्हन सुंदरम, हवालदार शरद वाकसे, दिनेश शिंदे, रोहिदास लवांडे, राजू रासगे, महेश पवार आदींनी ही कामगिरी केली.
चोरलेले दागिने गहाण ठेवले
सोनसाखळी हिसकविण्याच्या गुन्ह्य़ामध्ये चोरलेले दागिने आरोपींकडून सराफ किंवा कुणाला तरी कमी दरामध्ये विकले जातात. काही वेळेला ते वितळविण्यातही येत असतात. यापूर्वी पकडलेल्या आरोपींकडूनही हे सर्व प्रकार स्पष्ट झाले आहेत. चोरीचे दागिने घेणाऱ्या सराफांवरही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये मात्र आरोपींनी काही दागिने घरी ठेवले होते व काही दागिने सराफाकडे गहाण ठेवून त्या बदल्यात पैसे घेतले होते. हे सर्व दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा