लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या हेतूने सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने आयआयटीच्या धर्तीवर ‘चेअर प्रोफेसरशिप’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सीओईपीच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात येत असून, ज्येष्ठ उद्योजक, नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी ‘चेअर प्रोफेसरशिप’साठी एक कोटी रुपयांची देणगी सीओईपीला दिली आहे. या माध्यमातून येत्या शैक्षणिक वर्षात ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग अँड रिलेटेड एरियाज’ या विषयाची चेअर प्रोफेसरशिप सुरू करण्यात येणार आहे.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विनायक पै यांनी ही माहिती दिली. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत ‘डॉ. प्रमोद चौधरी चेअर प्रोफेसरशिप फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग अँड रिलेटेड एरियाज्’ या चेअर प्रोफेसरशिपच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरुड, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे, विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गिते, विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्या ए. डी. ठुबे, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, विद्यापीठाच्या रीसर्च, इनोव्हेशन ॲण्ड इंडस्ट्रियल लिंकेजेस संचालक डॉ. नरेंद्र ढोके, अभियांत्रिकी विद्याशाखेचे प्रमुख डॉ. पराग सदगीर, संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप देशमुख, सहयोगी अधिष्ठाता प्रा. प्रशांत बारटक्के, प्राज इंडस्ट्रीजचे डी. व्ही. निंबोलकर या वेळी उपस्थित होते. चेअर प्रोफेसरशिपसाठी डॉ. प्रमोद चौधरी यांच्याशी सामंजस्य करारही करण्यात आला.

डॉ. प्रमोद चौधरी यांच्या सहकार्याने सीओईपीच्या इतिहासात पहिल्यांदाच आयआयटीच्या धर्तीवर चेअर प्रोफेसरशिपचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून सीओईपीच्या विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग (एआयएमएल) क्षेत्रातील आधुनिक शिक्षण देण्यात येणार आहे. जगभरातील उत्तम शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. भिरूड यांनी सांगितले.

सीओईपीमध्ये चेअर प्रोफेसरशिप सुरू करण्यात येत असल्याचा आनंद आहे. त्यामुळे अनेकांना पुढे येऊन सीओईपीला अशाच प्रकारे मदत करण्यास प्रोत्साहन मिळेल. आयआयटी मुंबई येथे हरित रसायन, औद्योगिक जैवतंत्रज्ञान या विषयांसाठी चेअर प्रोफेसरशिप सुरू करण्याच्या माझ्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्याच धर्तीवर सीओईपीमध्येही सकारात्मक परिणामांची खात्री वाटते, असे डॉ. प्रमोद चौधरी यांनी नमूद केले.