आपल्याकडे खोटी नाणीच जास्त चालतात, बंदा रुपय्या चालत नाही आणि तो पेलवतही नाही, असे सांगत साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे शेतात गाडग्या-मडक्यात उभ्या केलेल्या बुजगावण्याप्रमाणे आहे, अशी टीका लेखक विश्वास पाटील यांनी भोसरीत बोलताना केली. संमेलनासाठी मोठे नेते शोधले जातात, विश्वास पाटलाला संमेलनात बोलावू नका, असे बजावून सांगितले जाते, असे ते म्हणाले. आपल्याकडे उसाच्या, तमाशाच्या आणि कुस्तीच्या फडातील ‘पाटील’ असतात. आपण मात्र गेल्या २५ वर्षांपासून शब्दांचे गुऱ्हाळ चालवणारे पाटील आहेत, अशी गमतीदार टिप्पणीही त्यांनी केली.
पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य अकादमी, महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी आयोजित शिक्षक प्रतिभा संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून पाटील बोलत होते. ४० मिनिटांच्या खुमासदार भाषणात पाटील यांनी अनेक भन्नाट किस्से सांगून उपस्थितांची मनेजिंकली. पाटील म्हणाले, समाजात बंदा रुपया पेलवत नाही म्हणून विठ्ठल वाघ यांच्यासारखा महान साहित्यिक संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकत नाही. संमेलनाच्या अध्यक्षस्थानावर बुजगावणे आणून बसवले जाते, तसेच यंदाही झाले. साहित्य क्षेत्रातील खऱ्या वाघाला संधी मिळत नाही म्हणूनच आम्ही बंड केले होते. साहित्य संमेलनात गुलजारला आणले गेले, त्यापेक्षा आपल्याकडील अनेक चांगले साहित्यिक आणणे शक्य होते. ‘बंदुकीतून सुटते गोळी’ हा बालिका नावाच्या एका महिला पोलीस हवालदाराने लिहिलेला कवितासंग्रह आहे, तिला संधी द्यायली हवी होती. मात्र तसे झाले नाही. संमेलनासाठी मोठे नेते शोधले जातात. विश्वास पाटलाला संमेलनात बोलावू नका, असे बजावून सांगितले जाते. त्यागातून न होता भोगातून मोठे झालेले नेते सध्या दिसून येतात. त्यांच्याकडे रडायलाही माणसे नसतात. वास्तविक खऱ्याच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. लेखकाने निर्भीडपणे विचार मांडले पाहिजेत. कामावर निष्ठा असली पाहिजे. दहा कोटी जणांची मराठी भाषा कधीही मरणार नाही. इंग्रजीची दहा आक्रमणे झाली तरी फरक पडणार नाही, असे ते म्हणाले. यशस्वी होण्यासाठी लहान वयातील संस्कार व वाचन महत्त्वाचे आहे. आपल्या जडणघडणीत शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शिक्षक कसा आहे, यावर विद्यार्थी घडतो. शिक्षकांशिवाय उत्तम राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. ७०-८० टक्के शिक्षक साहित्यिक शिक्षक होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा