महापालिकेच्या पंधरा प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीत गुरुवारी सहा अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली. त्यातील तीन अध्यक्षपदे राष्ट्रवादीला, एक काँग्रेसला, तर दोन अध्यक्षपदे भारतीय जनता पक्षाला मिळाली आहेत. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप आणि शिवसेना महायुती अशी होत आहे.
प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी अर्ज दाखल करायचे होते. त्यानुसार सर्व समित्यांसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर सहा समिती अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. बिनविरोध निवड झालेले अध्यक्ष पक्षनिहाय पुढीलप्रमाणे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस- सुषमा निम्हण (औंध प्रभाग समिती), सुनंदा देवकर (नगर रस्ता प्रभाग समिती), सतीश म्हस्के (येरवडा प्रभाग समिती), काँग्रेस- विजया वाडकर (हडपसर प्रभाग समिती), भाजप- मानसी देशपांडे (बिबवेवाडी प्रभाग समिती), धनंजय जाधव (विश्रामबागवाडा प्रभाग समिती). या सहा ठिकाणी अन्य कोणाचाच अर्ज न आल्यामुळे सहा अध्यक्ष बिनविरोध निवडून आले असून उर्वरित नऊ समित्यांच्या अध्यक्षपदासांठीची निवडणूक सोमवारी (८ एप्रिल) सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचार या वेळेत होणार आहे. जिल्हाधिकारी विकास देशमुख या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अर्ज दाखल झाल्यानंतर सोमवारी होणाऱ्या निवडणुकीचेही चित्र काही प्रमाणात समोर आले असून राष्ट्रवादीकडे पंधरापैकी आठ अध्यक्षपदे सत्ताधारी राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे दिसत आहे. निम्हण, देवकर आणि म्हस्के यांच्याबरोबरच शिवलाल भोसले, प्रशांत जगताप, लक्ष्मी दुधाने, प्रदीप गायकवाड आणि उषा जगताप हे राष्ट्रवादीचे उमेदवारही त्यांच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निवडून येतील असे चित्र आहे.