राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोडके शनिवारी स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आणि न कळतच त्यांच्या आजवरच्या प्रवासाची आठवण महापालिकेत निघाली. महापालिकेत एका महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या समितीचे अध्यक्ष झालेले बोडके पूर्वी पालिकेतच शिपाई म्हणून काम करत होते.
स्थायी समितीचे अध्यक्ष झालेले बाळासाहेब बोडके यांचे वडील काळुराम हे महापालिकेत नाईक या पदावर काम करत होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर बाळासाहेब बोडके यांनी महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयात १९७८ ते १९८३ अशी पाच वर्षे शिपाई म्हणून काम केले. पुढे ते राजकारणात उतरले. राजकीय कारकीर्दीला सुरुवात केल्यानंतर बोडके सलग तीन वेळा महापालिकेवर निवडून आले आहेत. महापालिकेतील विविध समित्यांवर काम करण्याची संधी त्यांना आतापर्यंत मिळाली होती आणि शनिवारी ते स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत निवडून आले.
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बोडके यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांचे आणि स्थायी समितीमधील सदस्यांचे आभार मानले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला अध्यक्षपदाची संधी पक्षाने दिली आहे. त्या संधीचे मी सोने करीन, असे ते म्हणाले. महापालिकेची मुख्य इमारत शिवाजीनगर परिसरात असून बोडके याच भागातील नगरसेवक आहेत. ‘या परिसरातील नगरसेवकाला अनेक वर्षांनंतर महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे,’ असे ते म्हणाले. ‘स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात कामे करण्यासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून कोणताही विलंब होणार नाही. शहरात चोवीस तास समान पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून पहिल्या टप्प्यातील कामे सहा महिन्यांत सुरू केली जातील. सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता आणि शहरातील उड्डाणपुलांची अर्धवट कामे वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करीन,’ असेही बोडके यांनी सांगितले.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोडके, काँग्रेसचे अविनाश बागवे आणि भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र शिळीमकर यांचे अर्ज आले होते. महापालिका सभागृहात शनिवारी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बागवे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे बोडके आणि शिळीमकर यांच्यात निवडणूक झाली. बोडके यांना राष्ट्रवादीची सहा आणि काँग्रेसची तीन अशी नऊ तर शिळीमकर यांना भाजपची तीन मते मिळाली.  मनसेचे तीनही सदस्य निवडणुकीत अनुपस्थित राहिले, तर शिवसेना निवडणुकीत तटस्थ राहिली.

Story img Loader