श्रीक्षेत्र जेजुरी परिसरातील दवणेमळा येथील शेतकऱ्यांनी लागवड केलेली दवण्याची शेती आता फुलोऱ्यात आली असून दवणा शेतामध्ये सर्वत्र पसरलेला सुगंध चैत्रमासाच्या आगमनाची चाहूल देत आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेला श्री खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार मानला जातो. याला प्रामुख्याने भंडार-खोबऱ्याबरोबर बेल व दवणा अर्पण केला जातो. हिंदू नववर्ष सुरू झाल्यावर पाडव्यापासून चैत्र मासात विविध देवदेवतांना दवणा वाहण्याची परंपरा आहे. जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा, शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव, लोणावळ्याची एकविरा देवी यांना दवणा वाहिला जातो. याशिवाय चैत्रातील यात्रा, उत्सवामध्ये दवणा लागतोच. जेजुरीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दवणे मळा या ठिकाणी दवण्याचे उत्पादन घेतले जाते. दवणा ही वनस्पती अत्यंत नाजूक असते. हिरवीगार बोंडे आल्याने अतिशय झुपकेदार दिसते. याचा सुगंध खुप येतो. दवणा पीक चार महिन्यात तयार होणारे असून साधारणता एक फूट उंचीपर्यंत झाड वाढते. कोथिंबीरीसारख्या पेंड्या बांधून पंचवीस ते पन्नास रुपयापर्यंत विकली जाते. प्रामुख्याने मुंबई परिसरातील कोळी व आगरी समाज बांधव मोठ्या प्रमाणात दवण्याची खरेदी करतात.मोराने फुलवलेल्या पिसाऱ्याप्रमाणे महिला डोक्यामध्ये दवण्याची विण करून घालतात. दवण्याचे मूळ संस्कृत नाव दमन असे आहे. याचा अपभ्रंश होऊन दवणा शब्द रूढ झाला. दवणा नावाचा पूर्वी शिवगण होता. त्याने बेलाप्रमाणे माझा स्वीकार व्हावा अशी भगवान शंकराकडे प्रार्थना केली, तेव्हा देवांनी त्याला तू सुगंधी वनस्पतीच्या रूपात जन्म घेशील तेव्हा मी तुला धारण करील असा वर दिला. त्यामुळे दवणा भगवान शंकराला फार प्रिय झाला. अशी आख्यायिका आहे.

भगवान शंकराला रुद्राभिषेक केल्यानंतर दवणा वाहण्याची प्रथा आहे. जेजुरीतील तयार होणारा दवणा खंडोबा गडाच्या पायथ्याशी विकला जातोच, याशिवाय दवण्याच्या लहान पेंड्या बांधून बांबूच्या करंडीतून मुंबई, पुणे आदी भागात पाठविला जातो.मद्रासमध्ये तयार होणाऱ्या मरवा या सुगंधी वनस्पतीची दवण्याचे साम्य आहे. कार्तिक महिन्यात गादी वाफे करून दवण्याचे रोप तयार करण्यात येते.मुळता हिमालयात आढळणारी ही वनस्पती आहे.दवण्याचा उपयोग धार्मिक कार्याबरोबरच विविध औषधांमध्ये केला जातो. उर्ध्वपतन पद्धतीने दवण्यापासून उंची अत्तरे, सेंट, अगरबत्ती, धूप तयार केले जातात, सध्या बाजारात दवणा उदबत्ती व धूप याला चांगली मागणी आहे. नाथ संप्रदायातील भक्तगण याचा वापर जास्त करतात. याच्या पाना-फुलांपासून तेल निघते. औषधी वनस्पती म्हणून दवणा प्रसिद्ध आहे. हा वात.पित्त कफ या त्रिदोषावर गुणकारी मानला जातो. श्री खंडोबा देवाला ओला व वाळलेला दवणा वर्षभर अर्पण केला जातो. देवाच्या श्रद्धेपोटी येथील माळी समाज बांधव आवर्जून दवण्याची परंपरागत शेती करतात. देवाच्या त्रिकाळ पूजेला हार, फुले, दवणा, बेल देण्याचा त्यांचा पूर्वीपासून मान आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पान, फुलांच्या पाट्यामध्ये दवणाच्या पेंड्या ठेवून त्याची विक्री केली जाते. येणारे भाविक मोठ्या प्रमाणात दवण्याची खरेदी करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसेही मिळतात. पाडवा, रामनवमी, अक्षयतृतीया या सणासाठी आम्ही दवण्याची पुण्यात जाऊन विक्री करतो, असे दवणा उत्पादक शेतकरी रोहिदास झगडे यांनी सांगितले.

हिंदू नववर्ष सुरू झाल्यानंतर पाडव्यापासून धार्मिक कार्यात दवणा खूप महत्त्वाचा मानला जातो. चैत्र मासातील शुक्ल पक्षात अनेक देवतांना दवणा कधी अर्पण करावा, याची पंचांगामध्ये माहिती दिली आहे. चैत्र शुक्ल चतुर्थीला श्री गणपती, षष्ठीला श्री कार्तिक स्वामी, सप्तमीला श्री सूर्यनारायण, नवमीला देवी, द्वादशीला श्रीविष्णू तर चतुर्दशीला श्री महादेवाला दवणा अर्पण केला जातो. याशिवाय गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, चैत्रगौरी, अक्षय तृतीया या सण उत्सवालाही दवणा वापरला जातो.

तरुणांनी दवण्यासह इतर औषधी वनस्पतींची शास्त्रीय पद्धतीने लागवड केल्यास यातून चांगला नफा मिळू शकतो.परदेशातही या उत्पादनांना मोठी मागणी आहे. जेजुरीत वर्षभरामध्ये लाखो भावी खंडोबाच्या दर्शनासाठी येतात ,वाळलेल्या दवण्यापासून अत्तर ,उदबत्ती ,धुप आदी उत्पादने जेजुरीत तयार केल्यास तेथेच त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. – अनिल चौधरी (औषधी वनस्पतीचे उत्पादक व उद्योजक अकोले, जि. अहिल्यानगर)