पुण्यातील नियोजित विमानतळ चाकण परिसरातच व्हावे, अशी चाकण, तळेगाव, रांजणगाव आदी भागातील उद्योजकांची मागणी आहे. चाकणला विमानतळ न झाल्यास या औद्योगिक पटट्यातील उद्योग महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित होण्याची भीती इंडस्ट्रीज असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केली आहे.
चाकणला विमानतळ व्हावे, यासाठी शहर व परिसरातील ७० टक्के उद्योजकांचे एकमत आहे. पिंपरी-चिंचवडसह चाकण, रांजणगाव, तळेगाव हा पट्टा ‘ऑटोमोबाईल हब’ म्हणून ओळखला जातो. या भागात जवळपास ४० ते ५० हजार लहान-मोठ्या कंपन्या आहेत. चाकणला विमानतळ होणार म्हणून अनेक मोठ्या कंपन्यांनी या भागात गुंतवणूक केली. अनेकांनी उद्योगही सुरू केले.
मात्र, चाकणला होणारे विमानतळ पुरंदरला नेण्यात आले. त्यामुळे उद्योजकांची फसवणूक केल्यासारखे झाले असून अनेकांची घोर निराशा झाली आहे. पुरंदरपेक्षा नवी मुंबईला द्रुतगती मार्गाद्वारे लवकर पोहोचणे शक्य आहे. विमानतळाअभावी येथून मोठे उद्योग पुन्हा स्थलांतरित होण्याची भीती आहे. कदाचित हे उद्योग महाराष्ट्राबाहेर सुद्धा जाऊ शकतात, असे भोर यांचे म्हणणे आहे.