पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीत मागील काही काळापासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. उन्हाळ्यात हे प्रमाण वाढल्याने उद्योगांना मोठा फटका बसत आहे. अनेक कंपन्यांना काम बंद ठेवावे लागत असून, त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे संकटात सापडलेल्या उद्योजकांनी अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीत सुधारणा करण्याची पावले उचलली आहेत.

चाकण औद्योगिक वसाहतीत वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. याबाबत कंपन्यांना कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. महावितरणकडून देखभालीचे काम सुरू असेल तर आधी याबाबत कंपन्यांना कळविले जात नाही. यामुळे अचानक कंपन्यांचे काम बंद पडते. उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण आणखी वाढले आहे. यामुळे कंपन्यांचे काम बंद राहून उत्पादन ठप्प झाले आहे. याचा आर्थिक फटका कंपन्यांना बसत आहे. यामुळे फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली.

आणखी वाचा-हिंजवडी आयटी पार्कमधून किती कंपन्या बाहेर गेल्या? एमआयडीसी अन् इंडस्ट्रीज असोसिएनशचा ताळमेळ बसेना

महावितरणचे विभागीय संचालक अंकुश नाळे आणि अधीक्षक अभियंता युवराज जरग यांच्यासोबत फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजची बैठक झाली. या बैठकीला फेडरेशनचे सचिव दिलीप बटवाल, संचालक मनोज बन्सल, ग्रॅबियल कंपनीचे व्यवस्थापक विनोद राजधान, पूना प्रेसिंगचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, ॲडविकचे नितीन सावंत, निखिल अग्रवाल यांच्यासह ७० कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उद्योजकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढूनही महावितरणचे स्थानिक अधिकारी दाद देत नाहीत, अशी तक्रारही त्यांनी केली. यावर महावितरणे विभागीय संचालक अंकुश नाळे यांनी बैठकीत स्थानिक अधिकाऱ्यांना याबाबत फैलावर घेतले. चाकणमध्ये देखभालीची कामे वेळेत केली जातील आणि उद्योगांना अखंडित वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

आणखी वाचा-महेश लांडगे, आश्विनी लक्ष्मण जगतापांच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा; महायुतीत तिढा?

चाकण उपविभागातील १ लाख १३ हजार ग्राहक असून, त्यात चाकण औद्योगिक वसाहतीतील सुमारे ७ हजार ८०० उच्च व लघुदाबाचे उद्योग आहेत. महावितरणकडून चाकण औद्योगिक वसातहतीतील उद्योगांना चांगली सेवा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. -राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, महावितरण

अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे चाकणमधील उद्योगांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच वीज पुरवठा खंडित होत असल्याने कंपन्यांचे नुकसान होत आहे. देशात सर्वांत जास्त विजेचा दर महाराष्ट्रातील उद्योगांसाठी आहे. -दिलीप बटवाल, सचिव, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज

उद्योजकांच्या अडचणी संपेनात…

  • देशात सर्वाधिक दराने महाराष्ट्रात उद्योगांना वीज
  • वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने उत्पादन ठप्प
  • वीज पुरवठ्याचा दाब कमी जास्त झाल्याने यंत्रसामग्री खराब
  • काम बंद असतानाही कामगारांना वेतन देण्याची वेळ
  • उत्पादन कमी झाल्याने अनेक वेळा कार्यादेश रद्द
  • आर्थिक नुकसान वाढल्याने अनेक उद्योग संकटात