चाकणमध्ये २७ वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेचं प्रियकरासोबत सोबत भांडण झालं होतं, त्यानंतर ती चाकणच्या बस स्थानकात आली आणि तिथून एक सुरक्षा रक्षक तिला रूमवर घेऊन गेला. तिथेच अज्ञात व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केलाचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेमुळे चाकण पोलिसांचा मात्र गोंधळ उडाला आहे. जो सुरक्षा रक्षक पीडितेला घेऊन गेला होता, त्याने तिच्यावर बलात्कार केलेला नाही, अस पोलिसांचं म्हणणं आहे. ही घटना काल (रविवार) मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी २७ वर्षीय पीडित महिलेने चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलासह पीडित महिला आपल्या प्रियकरासोबत राहात होती. मात्र पीडित महिला सतत फोनवर बोलत असल्याने तिचं आणि प्रियकराचं भांडण झालं. यानंतर ती मुलासह चाकण एसटी बस स्थानकात पोहचली. बराच वेळ झाल्याने तेथील सुरक्षा रक्षकाने इथं तुम्ही थांबू नका, इथं मद्यपान करणारी व्यक्ती येतात, तुम्ही घरी जा असे तिला सांगितले. मात्र मला घरी जायचं नाही असे पीडितेने सांगितलं, त्यावर ताई तुम्ही माझ्या रूमवर थांबा असे सुरक्षा रक्षक म्हणाला आणि त्यानंतर दोघे रूमवर गेले तिथे पीडित महिला रुममध्ये आतून कडी लावून मुलासह झोपली. परंतु, अज्ञात व्यक्तीने कशाच्या तरी मदतीने दरवाजाची आतील कडी उघडली आणि पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. असे पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.
हा अज्ञात व्यक्ती कोण याचा शोध पोलीस घेत आहेत. तर, या प्रकरणात पीडित महिला तपासात सहकार्य करत नसल्याचेही चाकण पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.