चाकणमधील सापांच्या विषाच्या तस्करीमागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, या तस्करीचे उत्तर प्रदेश ‘कनेक्शन’ असल्याची माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. दरम्यान, चौकशीत आणखी दोघांची नावे समोर आली आहेत.
पुण्याजवळील चाकणमध्ये पोलिसांनी सोमवारी रात्री एका घरावर टाकलेल्या छाप्यात १२५ ते १५० साप आढळून आले होते. या घरात तीन विषाच्या बाटल्याही सापडल्या. सापांच्या विषाची तस्करी करणाऱ्यांवर सर्प मित्र, चाकण पोलीस आणि वनविभागाने कारवाई केली होती. पुण्यातील चाकणमधील सारा सिटी सोसायटीत हा प्रकार सुरु होता. पोलिसांनी सर्प मित्र आणि वन विभागाच्या मदतीने छापा टाकून ही कारवाई केली होती. या प्रकरणी रणजित खारगे आणि धनाजी बेडकुटे यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सापांच्या विषाची तस्करीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता यात आणखी दोघांची नावे समोर आली आहेत. तर अटक आरोपी रणजित खारगे यावर विषाच्या तस्करी प्रकरणी मिरज आणि मुंबईमध्ये यापूर्वीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे उघड आहे. या तस्करीमागे मोठे रॅकेट असल्याचा संशय चाकण पोलिसांनी व्यक्त केला होता, त्या अनुषंगाने तपास सुरु केला असता, यात दोघांची नावे समोर आली आहेत. सांगलीतील डॉ. कदम नावाची व्यक्ती कडेगाव येथून विष घेऊन जात होता. तर दुसरी व्यक्ती पुण्यातून येऊन विष विकत घेत होता. मात्र या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही. यामध्ये लवकरच बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशमधील एक मोठी कंपनी विष खरेदी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. आतापर्यंत ७५ लाख रुपयांपर्यंत विषाची विक्री केल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. मात्र, यापेक्षा अधिक विक्री झाल्याचा अंदाज चाकण पोलिसांना आहे. अटकेत असलेले रणजित खारगे आणि धनाजी बेडकुटे सापांच्या विषाची तस्करी तीन वर्षांपासून करत होते. चाकणमध्ये त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून ठाण मांडला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.