पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) निर्देशांचा गैरफायदा घेऊन बनावट ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ लावून देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. संबंधित विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा दिला असून, नागरिकांनी राज्य सरकारच्या अधिकृत केंद्र चालकांकडूनच नोंदणी करून, परवानगीनंतरच पाटी लावावी, असे आवाहन आरटीओंकडून करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘आरटीओ’ने एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३१ मार्च पूर्वी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात २५ लाखांहून अधिक जुनी वाहने आहेत. वाहनधारकांना ऑनलाईन संकेतस्थळावर जाऊन नोदणी करण्यासाठी माहिती भरणे, अर्ज सादर करणे, वाहन स्वास्थ्य तपासणीसाठी केंद्रावर (फिटनेस सेंटर) घेऊन जाण्यासाठी काळ वेळ निश्चित करणे, शुल्क अदा करणे त्यानंतर क्रमांक लावून घेणे आदी प्रक्रिया वाहनधारकांना पूर्ण करायची आहे. मात्र, त्यासाठी कमी कालावधी असल्याचा फायदा घेऊन अनधिकृत विक्रेत्यांकडून ‘एचएसआरपी’ क्रमांकाची हुबेहूब पाटी तयार करून अल्पदरात बसवून देत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
नागरिकांना सुलभपणे अर्ज भरता येण्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, नागरिकांच्या सोयीनुसार वाहन तपासणी केंद्र, शुल्क भरणा आणि अधिकृत पाटी लावून देणारे केंद्र अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. – स्वप्नील भोसले, पुणे आरटीओ अधिकारी