मर्सिडीज बेंझसारख्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा दररोज एक तास वाहतूककोंडीत वाया जात असेल, यावरून एकंदरीत परिस्थितीचा अंदाज यावा. हिंजवडी आयटी पार्क, चाकणसह इतर औद्योगिक क्षेत्रांत पायाभूत सुविधांची स्थिती दयनीय आहे. यामुळे उद्योगांची चोहोबाजूंनी कोंडी होत आहे. नव्या वर्षात तरी उद्योगांना लागलेले हे ग्रहण सुटावे…
राज्यात औद्योगिक क्षेत्रात पुणे अग्रेसर आहे. देशातील माहिती-तंत्रज्ञान (आयटी) उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून पुण्याची ओळख आहे. वाहननिर्मितीपासून आयटीपर्यंत पुण्याने आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. देशातील सॉफ्टवेअर निर्यातीत पुणे हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या आर्थिक वर्षात १ लाख ५ कोटी ८१८ कोटी रुपयांची सॉफ्टवेअर निर्यात एकट्या पुण्यातून झाली. ही आकडेवारी केवळ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमधील आहे. या पार्कबाहेरही अनेक आयटी उद्योग असून, त्यांच्याकडून होणाऱ्या निर्यातीचा यात समावेश नाही. त्यामुळे प्रत्यक्षात सॉफ्टवेअर निर्यात आणखी जास्त आहे. पुणे जागतिक पातळीवर झेंडा फडकावत असतानाच, उद्योगांची अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे होणारी कोंडी तेवढीच प्रकर्षाने समोर येत आहे. याचा परिणाम उद्योगांसह त्यातील मनुष्यबळावर होत आहे. या दृष्टीने वेळीच उपाययोजना करायला हव्यात अन्यथा स्पर्धेत पुणे मागे पडण्याची भीती आहे.
हे ही वाचा… वाढत्या किमती अन् निवडणुकांमुळे घरांच्या बाजारपेठेला घरघर
गेल्या काही वर्षांत उद्योगांचा विस्तार पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागरीकरण आणि उद्योग वाढत असताना पायाभूत सुविधा निर्मितीचा वेग कमीच राहिला. पर्यायाने शहरातील पायाभूत सुविधांवरील ताण वाढला. यातून हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि इतर औद्योगिक क्षेत्रातील अपुऱ्या पायाभूत सुविधांचा प्रश्न वारंवार समोर येऊ लागला. त्यातच पुण्यातून काही कंपन्यांनी स्थलांतर केल्याचा दावा करण्यात आल्याने मोठा गदारोळ उडाला. कंपन्यांच्या स्थलांतराबाबत दावे-प्रतिदावे झाले, तरी या निमित्ताने अपुऱ्या पायाभूत सुविधांचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला.
हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूककोंडीबाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा होत आहे. ही कोंडी होण्यामागे आयटी पार्कसोबतच आजूबाजूच्या परिसराचा झालेला विस्तार हे प्रमुख कारण आहे. हा विस्तार होत असताना आयटी पार्कमधील रस्त्यांचा विस्तार झाला नाही. तेथील लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढत असताना रस्ते तेवढेच राहिले. यामुळे वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. सध्या हिंजवडीचा विचार करता प्रत्येक कर्मचाऱ्याचा दररोज किमान एक तास वाहतूककोंडीत जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा दिवसातील एक तास तरी अनुत्पादक ठरतो. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूककोंडीचाही हाच प्रकार आहे. चाकणमध्येही उद्योगांसोबत नागरीकरण वाढले आणि रस्ते तेवढेच राहिले.
पुण्यातून उद्योगांचे स्थलांतर झाल्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने येथील पायाभूत सुविधांबाबत सत्ताधाऱ्यांकडून पावले उचलण्यात आली आहेत. यामुळे दृश्य स्वरूपात बदल दिसत नसले, तरी पावले पडली, हेही नसे थोडके! हिंजवडीबाबत गेल्या वर्षी जुलैमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली होती. नवीन सरकार स्थापनेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डिसेंबर महिन्यात बैठक घेतली. या दोन्ही बैठकांतील मुद्दे तेच होते. हिंजवडीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लागला असून, इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीबाबत केवळ प्रक्रिया सुरू आहे. कारण हिंजवडी अथवा इतर औद्योगिक क्षेत्रे विविध शासकीय यंत्रणांच्या अखत्यारित येतात. विविध शासकीय यंत्रणांचा समन्वय साधून एखादा प्रकल्प पुढे नेण्याचे आव्हान आहे. हे आव्हान सर्व सरकारी यंत्रणांनी पार पाडल्यास नवीन वर्षात पुण्यातील उद्योगांना लागलेले ग्रहण सुटेल, अशी आशा आहे.