मर्यादित वाचकसंख्या आणि उच्च दर्जाचे साहित्य ही नियतकालिकांच्या संपादकांपुढील आव्हाने आहेत. मात्र त्यावर मात करून नियतकालिकांनी वाङ्मयीन संस्कृतीमध्ये भूमिका बजावली पाहिजे, अशी अपेक्षा साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी शनिवारी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद, अंतर्नाद आणि आपले जग मासिक यांच्यातर्फे नियतकालिकांच्या संपादकांची संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या समारोप सत्रात ‘नियतकालिकांकडून आमच्या अपेक्षा’ या विषयावर डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे व्याख्यान झाले.
परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रा.  मिलिंद जोशी, ‘अंतर्नाद’ चे संपादक भानू काळे आणि ‘आपले जग’ चे संपादक वसंतराव आपटे याप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, नियतकालिके हे मराठी वाङ्मयाचे प्रमुख अस्त्र आहे. पूर्वी अभिजात साहित्याला वाहिलेली नियतकालिके होती. मात्र, शिक्षणाचा प्रसार फारसा झालेला नसल्यामुळे वाचकवर्ग मर्यादित होता.
मात्र, आता शिक्षणाचा प्रसार होऊनही नियतकालिकांना वाचक लाभत नाहीत हे वास्तव आहे. मनासारखे लेखन मिळत नाही ही संपादकांची व्यथा आहे. नियतकालिकांचे संपादक सातत्याने बदलतात. त्यामुळे अंकाला स्वरूप प्राप्त होईपर्यंत तेच संपादक असतील याची खात्री नसते.
साहित्य संस्थांनी आपल्या मुखपत्राकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. लोकांना काय आवडते याचे आडाखे बांधून लेखन करणाऱ्या लोकप्रिय लेखकांमुळे अंकाची वाचकसंख्या वाढते. पण, त्यामुळे वाङ्मयामध्ये भर पडली असे म्हणता येणार नाही. नव्या पुस्तकांविषयीची चर्चा घडवून विविध प्रवाहांची ओळख करून देणे गरजेचे आहे. 

Story img Loader