पुणे : पुढील आठवडाभर राज्यात हवामान कोरडे राहून कमाल-किमान तापमानात फारसा चढ-उतार होण्याची शक्यता नाही. पूर्व विदर्भात पुढील आठवडाभरात पाऊस पडण्याची शक्यता नाही. पण, महिनाअखेरीस पुन्हा हलक्या पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील दोन आठवड्यांचा अंदाज शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार हिमालयीन परिसरात पुढील पाच बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता नाही. सध्या उत्तर कर्नाटकपासून छत्तीसगडपर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. तरीही हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. पुढील आठवडाभर राज्यात हवामान कोरडे राहून, कमाल-किमान तापमानात फारसा चढ-उतार होण्याची शक्यता नाही.
हेही वाचा >>>कृत्रिम प्रज्ञेमुळे भविष्यात मोठी स्थित्यंतरे; नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ मायकेल स्पेन्स यांचे प्रतिपादन
विदर्भात मागील दोन दिवसांपासून हलका पाऊस पडत आहे. पुढील आठवड्यात पावसाची शक्यता नाही. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे.
शुक्रवारी सोलापुरात सर्वाधिक ३७.० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी ३२.० अंश सेल्सिअस तर मराठवाड्यात कमाल तापमान सरासरी ३३.० अंश सेल्सिअस होते.