पुणे: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. शनिवारी, १६ मार्चपासून सोमवारी, १८ मार्चपर्यंत तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयात एक थंड हवेचा झंझावात द्रोणिका रेषेच्या स्वरुपात सक्रिय आहे. एक वाऱ्याची चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थानवर निर्माण झाली आहे. तसेच एक द्रोणिका रेषा ओदिशापासून अरबी समुद्रापर्यंत तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात प्रामुख्याने विदर्भात आद्रतेचे प्रमाण वाढले आहे. राज्याच्या अन्य भागांत कोरडे वातावरण आहे.
हेही वाचा >>>भाजपकडून पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर
एक द्रोणिका रेषा ओदिशापासून अरबी समुद्रापर्यंत तयार झाली आहे. त्यामुळे विदर्भात आद्रतेचे प्रमाण वाढले आहे. शनिवार ते सोमवार असे तीन दिवस अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि ईशान्य मराठवाड्यात पुढील काही दिवस ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.