पुणे : राज्यातील अंशत: ढगाळ वातावरणाची स्थिती निवळली असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यापाठोपाठ आता राज्याच्या सर्वच भागांत थंडीचा कडाका काही प्रमाणात वाढणार आहे. सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असल्याने या भागातील गारव्यात वाढ झाली आहे. पुढील एक-दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही तापमानात घट होणार आहे.
बंगालचा उपसागर आणि त्यानंतर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने दक्षिणेकडील तमिळनाडू आणि जवळच्या राज्यांत जोरदार पाऊस झाला. केरळमध्येही पावसाची हजेरी होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रामुख्याने दक्षिणेकडील भागांत अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातून रात्रीच्या किमान तापमानात वाढ होऊन प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि कोकणात थंडी कमी झाली. सध्या दक्षिणेकडील पावसाळी स्थिती निवळली आहे. त्यामुळे राज्यातही निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर-दक्षिण भारतात रात्रीच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होणार आहे. परिणामी संपूर्ण महाराष्ट्रातील किमान तापमानात काही प्रमाणात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: पुणे: उच्च शिक्षण संचालकपदी डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची नेमणूक
बंगालच्या उपसागरामध्ये दोन दिवसांत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्याचा सध्या तरी राज्यावर कोणता परिणाम होणार नसल्याचे दिसते आहे. या काळात राज्यातील तापमानात घट होणार आहे. निरभ्र आकाशामुळे दिवसाच्या कमाल तापमानात मात्र काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कमाल आणि किमान तापमानात किंचित चढ-उतार होऊ शकतात. राज्यात आठवड्यात कुठेही पावसाळी स्थिती किंवा पावसाची शक्यता नाही.
हेही वाचा: संतापजनक! वडील, चुलत्याने केला १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार; आजोबांकडून विनयभंग
विदर्भात सर्वाधिक गारवा
कोरडे हवामान आणि निरभ्र स्थितीमुळे सध्या विदर्भातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. बुधवारी (१६ नोव्हेंबर) गोंदिया येथे राज्यातील नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत ४.२ अंशांनी कमी होते. अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आदी भागांतही सरासरीच्या तुलनेत किमान तापमान २ ते ४ अंशांनी घटले आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत १३ ते १४ अंशांवर आणि सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांच्या खाली तापमानाचा पारा आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण विभागात मात्र सरासरीजवळ तापमानाची नोंद होते आहे.