लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: एनडीए चौकातील (चांदणी चौक) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) करण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम १५ ते २० एप्रिल या कालावधीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत या चौकातील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात येणार आहे.
या चौकातील नवा उड्डाणपूल आणि रस्त्यांचे उद्घाटन १ मे रोजी करण्याचे केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर येथील कामे वेळेवर आणि गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एनडीए चौक परिसरात १५ मार्च रोजी भेट देऊन कामांची पाहणी केली होती. जुन्या पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. त्यासाठी १५ ते २० एप्रिल या काळात गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार असून या मार्गाची माहिती नागरिकांना करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बुधवारी दिली.
आणखी वाचा- पुण्याला हक्काचे पाणी मिळणार का?
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘एनडीए चौक परिसरातील नवा उड्डाणपूल आणि तेथील रस्त्यांचा एनएचएआयकडून आढावा घेण्यात आला. त्यानुसार या चौकातील उड्डाणपूल आणि रस्त्यांची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. नव्या उड्डाणपुलासाठी आवश्यक खांब उभारणीचे काम पूर्ण झाले असून १५ ते २० एप्रिल या कालावधीत उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्याकरिता दोन दिवस वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन एनएचएआयकडून करण्यात येणार आहे.’ मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. याशिवाय बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून १० एप्रिलपासून हे रस्ते वाहनधारकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे एनएचएआयकडून सांगण्यात आले.
एनडीए सर्कल सुशोभीकरणाचा आराखडा तयार
एनडीए चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी करण्यात येत असलेले काम अंतिम टप्प्यात असल्याचे एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले. सद्य:स्थितीत प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एनडीए सर्कल सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास एनडीएकडून सहमती मिळाली आहे.