पुणे : शहराच्या पश्चिम द्वार आणि महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी एनडीए चौकातील (चांदणी चौक) उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले असले, तरी या समारंभासाठी उभारलेला मंडप अद्याप काढण्यात आला नसल्याने उड्डाणपूल वाहनांसाठी बंदच आहे. तसेच या चौकात दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालक गोंधळात पडत आहेत. मार्ग चुकल्याने वाहनचालकांना काही किलोमीटर लांब अंतराचा वळसा घ्यावा लागत असल्याने हा चौक म्हणजे ‘भलभुलैया’ असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून करण्यात येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराच्या पश्चिम द्वाराकडे होत असलेली वाहतूककोंडी आणि मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील होत असलेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी एनडीए चौकात नव्याने उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्रीय भुपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (१२ ऑगस्ट) उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. या चौकात तब्बल आठ रस्ते एकत्र येत आहेत. त्यामुळे इच्छित स्थळी जाण्यासाठी कोणता रस्ता आहे, याबाबत वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण होत असून, मार्ग चुकल्याने काही किलोमीटर लांब अंतराचा वळसा वाहनचालकांना घ्यावा लागत आहे.

हेही वाचा >>> मोटारीतून येऊन महावितरणच्या रोहित्रातून तांब्याची तार चोरणारी टोळी गजाआड

उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी कमी होणार असली, तरी कोठे वळायचे याचे दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालक चुकीच्या मार्गाने पुढे जात आहेत. ज्या ठिकाणी दिशादर्शक फलक आहेत, ते अत्यंत लहान अक्षरात आणि आकारात आहेत. वाहनचालकांचे या फलकांकडे लक्ष जात नाही. दिशादर्शक फलकाच्या जवळ गेल्यानंतरच मार्गांची माहिती मिळत आहे. मात्र, पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनांच्या धास्तीमुळे दिशादर्शक फलकाजवळ थांबणेही गैरसोईचे ठरत आहे. स्वतंत्र मार्गिका असल्या, तरी गतिरोधकांचा अभावही रस्त्यांवर दिसून येतो आहे. त्यामुळे मोठ्या आकाराचे दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

वाहनचालकांचा होणारा गोंधळ लक्षात घेऊन सेवा रस्ते, वळणांची माहिती देणारे मोठ्या आकारातील दिशादर्शक फलक लावावेत, महत्त्वाच्या ठिकाणी वाॅर्डनची नियुक्ती करावी, वळण घेण्याआधी शंभर-दोनशे मीटर अंतरावर फलक असावेत, अशा उपाययोजना करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandni chowk lack of direction boards causes confusion among motorists pune print news apk 13 ysh