सहकार क्षेत्रात गैरकारभार होऊ नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सहकार क्षेत्रात आदर्शवत कामगिरी करणाऱ्या संचालकांना डबघाईला आलेल्या संस्थांवर प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सहकार क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांनी डबघाईला आलेल्या तसेच येऊ घातलेल्या संस्था दत्तक घ्याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षांचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. बँकेचे कार्यकारी संचालक आर. आत्माराम, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उदय पटवर्धन, सोसायटीचे अध्यक्ष अनिल बळी, सचिव विजय राव, संस्थापक सदस्य बाळासाहेब फडणवीस, डॉ. सुनील देशपांडे, विराज टिकेकर, दिनेश कुलकर्णी, राज चौधरी या वेळी उपस्थित होते.
सहकारी संस्थांमधील गैरकारभार मोडून काढला नाहीतर सहकार मोडून पडेल. अशा परिस्थितीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीसारख्या उत्तम काम करणाऱ्या संस्थांकडून अपेक्षा वाढतात. डबघाईला आलेल्या संस्थांचा कारभार सुधारण्यासाठी अशा संस्थांमधील संचालकांना प्रशासक म्हणून नेमण्यात येणार असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी संस्थांनी सभासदांच्या क्रीडापटू मुलांसाठी प्रोत्साहन म्हणून कर्ज द्यावे.
तळागाळामध्ये चांगले काम करणाऱ्या अनेक संस्था आजही कार्यरत आहेत. काही व्यक्तींचा कारभार चुकीचा असला तरी सहकार क्षेत्र अजूनही भक्कम आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रस्थ वाढत असतानाच्या काळात सहकार चळवळ मजबूत करणे आवश्यक असल्याचे उदय पटवर्धन यांनी सांगितले. लता राव यांनी सूत्रसंचालन केले. अनिल बळी यांनी आभार मानले.
सहकार क्षेत्रात गैरकारभार होऊ नयेत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील – सहकारमंत्री चंद्रकांत पाटील
सहकार क्षेत्रात आदर्शवत कामगिरी करणाऱ्या संचालकांना डबघाईला आलेल्या संस्थांवर प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
First published on: 24-03-2015 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil admires bank of maharashtra worker crd coop soc