पराभवामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, आगामी काळात विजय आपलाच आहे, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. त्यानंतर आता जिंकेपर्यंत लढायचेच, असा निर्धार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा खासदार गिरीश बापट आणि भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांची भेट घेतली. हेमंत रासने यांच्या भेटीवेळी त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागण्याची सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली.
हेही वाचा >>>पुणे: राजीनामा दिलेला नसतानाही ‘नॅक’च्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती; नियुक्तीवर आक्षेप घेत डॉ. भूषण पटवर्धन यांच्याकडून चौकशीची मागणी
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हेमंत रासने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. भेटीवेळी रासने यांच्या घरी कसबा मंडलाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा >>>नगरमधील एकाकडून २४ लाखांचे अमली पदार्थ जप्त; पुणे-सोलापूर रस्त्यावर गुन्हे शाखेची कारवाई
पालकमंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पोट निवडणुकीत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले. संघर्ष भाजपचा स्थायीभाव आहे. संघर्षाच्या बळावरच अनेक आव्हानांचा अतिशय समर्थपणे सामना करुन आव्हाने परतवून लावली आहेत. पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी आहे. त्यामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, आगामी काळात विजय आपलाच आहे,” असा विश्वास दिला. यानंतर सर्वांनी आता जिंकेपर्यंत लढायचं, असा निर्धार व्यक्त केला.दरम्यान, रासने यांच्या भेटीपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी खासदार गिरीश बापट यांचीही सदिच्छा भेट घेतली. पाटील यांनी खासदार बापट यांच्या तब्येची विचारपूस केली.