विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांची जागा राखली असून, त्यांनी राष्ट्रवादीच्या सारंग पाटील यांच्यावर २३८० मतांच्या फरकाने विजय मिळविला. शिक्षक मतदार संघामध्ये शिक्षक कृती समितीचे दत्तात्रय सावंत यांनी भाजपच्या भगवानराव साळुंखे यांना जोरदार धक्का देत विजय मिळविला.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीमध्येही मोदी लाटेचा मोठा प्रभाव दिसेल, असे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात हा प्रभाव फारसा जाणवला नसल्याचे उमेदवारांना मिळालेल्या मतांवरून दिसते आहे. पुणे पदवीधरमध्ये पहिल्या पसंतीचा कोटा ७६ हजार २०१ मतांचा होता. हा आकडा गाठण्यात कोणत्याही उमेदवाराला यश आले नाही. एक लाख ६२ हजार २१३ मतांपैकी पहिल्या फेरीत चंद्रकांत पाटील यांना ५१ हजार ७११, तर सारंग पाटील यांना ४४ हजार ७७० पहिल्या पसंतीची मते मिळाली. नंतरच्या फेऱ्यांमध्ये चंद्रकांत पाटील यांची आघाडी दोन हजार मतांनी घटली.
कोल्हापूर, सातारा भागातून चांगली मते मिळाल्याने सारंग पाटील यांनी मुसंडी मारली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. चंद्रकांत पाटील यांना एकूण ६१ हजार ४५३, तर सारंग पाटील यांना ५९ हजार ७३ मते मिळाली. बंडखोर अरुण लाड यांना ३७ हजार १८९, शैला गोडसे यांना १० हजार ५९४, तर जनता दलाचे शरद पाटील यांना ८ हजार ५१९ मते मिळाली.
शिक्षक मतदार संघामध्ये १९ हजार ४२८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. दत्तात्रय सावंत यांनी १३ हजार ९२२ मते मिळविली. भगवानराव साळुंखे यांना ९ हजार ६३४, काँग्रेसचे मोहन राजमाने यांना १२ हजार ३९३, गणपत तावरे यांना ४ हजार ४४१, सुभाष माने यांना ३ हजार ३५४, तर दशरथ सगरे यांना ३ हजार ३२० मते मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil and dattatraya sawant wins legislative council election